१६ मार्च २०१२ हा दिवस भारतीय क्रीडा रसिकांच्या मनात पुढची अनेक वर्ष कायम कोरलेला राहणार आहे. ज्या क्रिकेटवर भारतीय क्रीडा रसिकांनी मनापासून प्रेम केलं, त्या खेळातील त्यांचा सर्वात आवडता खेळाडू म्हणजेच सचिन तेंडुलकरने आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतलं शतकांचं शतक पूर्ण केलं होतं. बांगलादेशविरुद्ध सामन्यात खेळताना ढाक्याच्या शेर ए बांगला मैदानात सचिनने आपलं शंभरावं शतक साजरं केलं होतं.

मात्र हा मैलाचा दगड पार करण्यासाठी सचिन तेंडुलकरला वर्षभर वाट पहावी लागली. २०११ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात सचिनने आपलं ९९ वं शतक झळकावलं होतं. मात्र यानंतर सचिन नर्व्हस नाईन्टीच्या फेऱ्यात अकडला. विश्वचषकानंतर सचिनला आपलं शंभरावं शतक साजरं करण्याच्या अनेक संधी आल्या, मात्र प्रत्येक वेळी त्याला नशिबाने हुलकावणी दिली. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आपलं शंभरावं शतक साजरं करताना सचिनने ११४ धावा काढल्या होत्या. मात्र दुर्दैवाने या सामन्यात भारतीय संघाला बांगलादेशकडून हार पत्करावी लागली होती.

सचिनच्या शंभराव्या शतकानंतर सर्व चाहत्यांनी त्याचं मनापासून कौतुक केलं. मात्र काही क्रीडाप्रेमी आणि प्रसारमाध्यमांनी सचिनला शंभराव्या शतकानंतरही टीकेचं धनी बनवलं होतं. आपल्या ८० धावा झाल्यानंतर पुढच्या २० धावा काढण्यासाठी सचिनने तब्बल ३६ चेंडू खर्ची घातले. सचिनने शतक पूर्ण करण्यासाठी जास्त चेंडू घेतल्यामुळेच भारताला पराभवाचा सामना करावा लागल्याची टीका करण्यात आली होती. मात्र वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर झळकावलेल्या महाशतकाच्या आठवणी भारतीयांच्या मनात कायम राहतील यात काही शंका नाही.