भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अजून एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. मात्र यावेळी हा रेकॉर्ड मैदानावर नाही तर मैदानाबाहेर करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर विराट कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या १० कोटी झाली असून तो पहिलाच भारतीय आणि विशेष म्हणजे पहिलाच क्रिकेटर ठरला आहे. जगभरातील खेळाडूंच्या यादीत विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो, लियोनल मेस्सी आणि नेमार ज्युनिअर या यादीत पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.

जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या १० क्रिकेटर्समध्ये इन्स्टाग्रामवर प्रायोजित पोस्टच्या माध्यमातून कमाई करणारा विराट कोहली एकमेव क्रिकेटर आहे. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स रोनाल्डोच्या नावे आहेत. रोनाल्डोचे २६.५ कोटी फॉलोअर्स आहेत. तर मेस्सी १८.६ कोटी आणि नेमार १४.७ कोटी फॉलोअर्सहित दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

विराट कोहलीचा खूप मोठा चाहतावर्ग असून सोशल मीडियावरही त्याला मोठ्या प्रमाणात फॉलो केलं जातं. विराट कोहलीने प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, दीपिका यांनाही इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या यादीत मागे टाकलं आहे. इतकंच नाही तर विराट कोहली सर्वाधिक ब्रॅण्ड व्हॅल्यू असणारा सेलिब्रेटीदेखील आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

विराट कोहली सध्या अहमदाबादमध्ये असून इंग्लंडविरोधातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी तयारी करत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर भारताने जबरदस्त पुनरागमन करत सलग दोन सामने जिंकले. चार सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या २-१ ने आघाडीवर असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपमध्ये पोहोचण्यासाठी चौथा सामना किमान अनिर्णित राखणं गरजेचं आहे.