भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने कोलबोंच्या मैदानात कारकिर्दीतील ३० वे शतक झळकावले. या शतकी खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेला सहज पराभूत केले. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील कोहलीचे हे दुसरे शतक होते. या शतकानंतर त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगच्या एकदिवसीय सामन्यातील शतकांशी बरोबरी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांमध्ये आता केवळ सचिन तेंडुलकरच विराट कोहलीच्या पुढे आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतके झळकावली आहेत.

सध्याच्या घडीला कोहली शतकाच्या शर्यतीत सचिनपेक्षा मागे असला तरी सरासरीच्या तुलनेत तो सचिन आणि रिकी पाँटींग दोघांच्याही खूपच पुढे आहे. कोहलीने ३० शतकांचा पल्ला केवळ १९२ एकदिवसीय सामन्यातील १८६ डावात पार केला आहे. सचिन आणि रिकी पाँटींग यांना आपल्या कारकीर्दीतील सुरुवातीच्या १९२ सामन्यांमध्ये अनुक्रमे १६ आणि १५ शतके झळकावता आली होती. अर्थात दोघांची मिळून ३१ शतके होतात, मात्र कोहलीने १९२ सामन्यांमध्ये एकट्यानेच ३० शतके केली आहेत. त्यामुळे कोहलीच्या शतकांची संख्या ही सचिन आणि पाँटींगपेक्षा दुप्पटच असल्याचे दिसते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने शतकांचे शतक पूर्ण केले आहे. कसोटीत सचिनच्या नावे ५१ शतके आहेत. कोहलीने जर खेळातील सातत्य कायम राखले तर सचिनचा विश्वविक्रम कोहलीच्या नावावर होईल, अशी चर्चा आता आणखी जोर धरु लागली आहे. मात्र सचिनशी होत असलेल्या तुलनेबद्दल कोहली म्हणाला आहे की, ‘सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करणे सोपे नाही. एवढेच नव्हे तर सचिनच्या महाशतकांचा विक्रम मोडण्याचा विचार घेऊन मी कधीच मैदानात उतरत नाही. माझ्या नाबाद ९० धावांचे योगदान संघासाठी महत्त्वपूर्ण ठरल्यास मला खूप समाधान मिळते.’