आयसीसीच्या फलंदाजांसाठीच्या टी २० रँकिंगमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची प्रगती झाली आहे. या आठवड्यात ICC कडून जारी करण्यात आलेल्या यादीमध्ये विराट कोहलीने ६९७ पॉइंटसह ६व्या स्थानी झेप घेतली आहे. याआधी विराट कोहली सातव्या स्थानावर होता. त्यासोबतच के एल राहुलने ८१६ पॉइंटसह आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. दर आठवड्याला आयसीसीकडून ही यादी जाहीर केली जाते. या यादीत पहिल्या १० फलंदाजांमध्ये दोन भारतीय फलंदाजांचा समावेश असून, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे देखील प्रत्येकी २ फलंदाज आहेत. याशिवाय, पाकिस्तान, द. आफ्रिका, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या प्रत्येकी एका फलंदाजाचा यादीत समावेश आहे.

यादीमध्ये सर्वात वर इंग्लंडचा डेविड मलन असून त्याच्या नावावर ९१५ पॉइंट आहेत. विराट कोहलीप्रमाणेच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (८०१) आणि दक्षिण आफ्रिकेच्या वॅन डेर डसेन (७००) यांच्याही स्थानात सुधारणा होऊन त्यांना अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या स्थानावर जागा मिळाली आहे.

icc t20i ranking for batsmen
फोटो सौजन्य – आयसीसी

दरम्यान, न्यूझीलंडचा डावखुरा फलंदाज डेवॉन कॉनवे आणि सलामीवीर मार्टिन गपटिल यांच्या गुणांकनात मोठी वाढ झाली आहे. सध्या न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० सीरिज सुरू असून त्यामध्ये या दोघांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्यांच्या गुणांकनात सुधारणा झाली आहे. परिणामी कॉनवेच्या स्थानात तब्बल ४६ ने सुधारणा होऊन त्याने यादीत थेट १७व्या स्थानी झेप घेतली आहे. तर मार्टिन गप्टिलने देखील १४व्या स्थानावरून ११व्या स्थानी झेप घेतली आहे.