श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीनं क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमाबद्दल खंत व्यक्त केली. कोणत्याही मालिकेच्या तयारीसाठी किमान एका महिन्याचा वेळ मिळायला हवा. पण तो मिळत नाही. कोणताही पर्याय नसल्यामुळे अपुऱ्या तयारीने मैदानात उतरावे लागते. याचा खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतो. असे सांगत त्याने बीसीसीआयच्या ढिसाळ नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी एका महिन्याचा कालावधी द्यायला हवा होता. या परिस्थितीत देखील आम्ही चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र, पुढील काळात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यावर विचार करण्याची गरज आहे, असे विराटने म्हटले आहे.

सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात मालिका सुरु आहे. यातील एक कसोटी सामना झाला असून दोन कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-२० सामने बाकी आहेत. २४ डिसेंबरला मुंबईतील वानखेडेच्या मैदानावरील टी-२० सामन्यांने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेचा समारोप होईल. त्यानंतर भारतीय संघ २७ डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघ तीन कसोटी, सहा वनडे आणि तीन टी-२० सामने खेळाणार आहे.

विराट म्हणाला की, एका मालिकेनंतर लगेच दुसरी मालिका खेळणे फार कठीण आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी आम्हाला फक्त दोन दिवस मिळतात. या दोन दिवसांत आम्हाला तयारी करावी लागणार असून स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. वेळापत्रक भरगच्च आहे. कसोटी मालिका संपल्यानंतर खेळाडूंच्या कामगिरीवर चर्चा रंगते. काहीवेळा टीकेला देखील सामोरे जावे लागते. यावेळी मालिकेत उतरण्यापूर्वी आम्हाला तयारीसाठी किती वेळ मिळाला याचा कोणीही विचार करत नाही, अशा शब्दांत त्याने टिकाकारांना टोला लगावला.