करोना विषाणूच्या विळख्यापासून वाचण्यासाठी सध्या अनेक देशात ‘लॉकडाउन’ची स्थिती आहे. भारतासह देशभरातील क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. सर्व क्रीडापटू आणि त्यांचा सहाय्यक कर्मचारी वर्ग आपापल्या घरी आहेत. या काळात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने शुक्रवारी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि त्या फोटोबाबतच्या त्याच्या भावना व्यक्त केल्या. पण विल्यमसनने मात्र त्या फोटोवर विराटला एक मजेशीर प्रश्न केला. त्यानंतर विराटनेही त्यावर मस्त उत्तर दिले.

भारतीय संघ जानेवारी ते मार्च या कालावधीत न्यूझीलंड दौऱ्यावर होता. या दौऱ्यातील कसोटी मालिकेदरम्यान दोन्ही संघाचे कर्णधार ब्लेझर घालून ड्रेसिंग रूममधून बाहेर येत होते. तेव्हा एक फोटो टिपण्यात आला. तोच फोटो विराटने पोस्ट केला आणि त्या फोटोला, ‘आपल्या गप्पा आठवल्या. खूप मजा आली होती. केन तू खूप चांगला माणूस आहेस’, असे कॅप्शन दिले.

 

View this post on Instagram

 

Love our chats . Good man @kane_s_w

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

या फोटोवर विल्यमसनने मजेशीर प्रश्न केला. “मला गप्पा मारायला खूप मजा आली. आपण लवकरच भेटू. पण सध्या मी हा विचार करतोय की आपल्यात नक्की उंच कोण आहे?”, असा प्रश्न विल्यमसनने विचारला. त्यावर विराटनेही मस्त उत्तर दिले. “मी पण उंच कोण याचाच विचार करतोय. बहुतेक मीच उंच आहे. मला तसा विश्वास वाटतो”, असा रिप्लाय विराटने दिला.

भारतीय संघ जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ते चार मार्चपर्यंत न्यूझीलंड दौऱ्यावर होता. मालिकेतील टी २० क्रिकेट मालिका भारताने ५-० ने जिंकली. त्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी मालिका न्यूझीलंडने अनुक्रमे ३-० आणि २-० अशी जिंकली.