फटाक्यांनी भरलेलं फळ खायला दिल्यामुळे केरळमधील मल्लपूरम जिल्ह्यात एका गर्भवती हत्तीणीला आपले प्राण गमवावे लागले. २७ मे रोजी घडलेली ही घटना केरळमधील वन-विभागाच्या अधिकाऱ्याच्या फेसबूक पोस्टमुळे प्रसारमाध्यमांमध्ये आली. देशभरातून या घटनेचा निषेध होत आहे, अनेक सेलिब्रिटींनीही या प्रकाराबद्दल चीड व्यक्त केली असून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीही हत्तीणीच्या मृत्यूनंतर शोकाकूल झाला आहे.

अवश्य वाचा – BLOG : तुम्ही हत्तीचा नाही, माणुसकीचा खून केलात !

विराटने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या घटनेचा निषेध व्यक्त केला असून प्राण्यांनाही प्रेमाची वागणूक मिळायला हवी असं आवाहन केलं आहे.

दरम्यान, प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी आल्यानंतर केरळ वन-विभागाने हत्तीणीच्या मारेकऱ्यांचाा शोध सुरु केला आहे. केरळच्या Silent Valley National Park चे वॉर्डन सॅम्युअल पचाऊ यांनी IANS वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली. “या प्रकारामागे जे कोणी असतील त्यांचा आम्ही शोध घेऊ. एखाद्या प्राण्याची हत्या करणं गुन्हा आहे आणि गुन्हेगारांना पकडल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही.”