सहप्रशिक्षक मुनीश बाली यांना आशा

नवी दिल्ली : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २००८ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक उंचावला, तेव्हाच्या आणि आताच्या कोहलीमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. तंदुरुस्तीच्या बाबतीत कोहलीने स्थित्यंतर केले आहे. आक्रमक खेळ करणाऱ्या कोहलीने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला आहे. त्याची प्रगती पाहता सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमधील ४९ शतकांचा विक्रम कोहली मोडीत काढेल, अशी आशा २००८ मधील विश्वविजेत्या १९ वर्षांखालील संघाचे सहप्रशिक्षक मुनीश बाली यांनी व्यक्त केली.

विराटच्या नावावर २१४ सामन्यांमध्ये ३९ शतके आहेत. सचिनचा विक्रम मोडीत काढण्यासाठी त्याला फक्त ११ शतकांची आवश्यकता आहे. सचिनचा हा विक्रम कोहली मोडू शकेल का, यावर काही जणांमध्ये दुमत आहे. मात्र मुनीश बाली यांना मात्र कोहलीच हा विक्रम मोडीत काढू शकतो, असा विश्वास आहे.

ते म्हणतात, ‘‘तंदुरुस्ती दर्जा, धावांची भूक, जिंकण्यासाठीची तळमळ यामुळे कोहलीने भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. विराटने सर्व संधीचे सोने केले आहे. संघाला गरज असताना तो नेहमीच धावून आला आहे. दैवी देणगी लाभलेला हा खेळाडू आपली कामगिरी सुधारण्यासाठी कठोर परिश्रम घेत असतो. म्हणूनच अल्प कालावधीतच त्याने महान क्रिकेटपटूंच्या स्थान मिळवले आहे.’’