देशासाठी आत्मविश्वासू खेळी करण्यासाठी प्रेरणास्थान म्हणून मला जास्त दूरचा विचार करण्याची गरजच भासत नाही. विराट कोहलीच्या खेळीतून माझ्या आत्मविश्वासात वाढ होते, त्यामुळे अशा युवा खेळाडूसोबत खेळण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो, अशी स्तुतीसुमने भारतीय संघाचा युवा फलंदाज लोकेश राहुल याने कोहलीवर उधळली. ‘ईएसपीएन’ला दिलेल्या मुलाखतीत लोकेश राहुल म्हणाला की, ज्या खेळाडूकडून मला प्रेरणा मिळते तो खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये अगदी माझ्या जवळ असतो, त्यामुळे जास्त दूरचा विचार करण्याची गरज भासत नाही. विराटची खेळाप्रतीची बांधिलकी आणि मेहनत पाहून माझ्या आत्मविश्वासात नेहमी वाढ होत असते. ज्यापद्धतीने विराटने आपल्या फिटनेसला घेऊन स्वत:च्या शरीरयष्टीत बदल केले आहेत, ते युवा खेळाडूंना प्रेरणा देणारे आहे, असेही तो पुढे म्हणाला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणात विराटने मला खूप मदत केली. माझ्या सरावावेळी, मानसिक तयारीबाबतही सल्ले दिले. त्यामुळे माझ्या आत्मविश्वासात वाढ झाली. एका खेळाडूसोबतच तो व्यक्ती म्हणूनही खूप मोठा असल्याचे लोकेश राहुल म्हणाला.