भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांबद्दल बोलायचे झाले, तर दोघांचे स्वभाव पूर्णपणे वेगळे आहेत. धोनी कर्णधार म्हणून मैदानावर असताना शांत आणि संयमी असायचा, तर विराटची ओळख अतिशय आक्रमक कर्णधार अशी आहे. दोघांनी भारतीय संघाला अनेक मालिकांमध्ये विजय मिळवून दिले. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर संघाचे नेतृत्व करण्याची संधी विराटला मिळण्यासाठी धोनीनेच मदत केली, असे स्वत: विराटने सांगितले. दोघांचे स्वभाव भिन्न असल्याने टीम इंडियाची दोन वेगळी रूपं गेल्या दहा वर्षात चाहत्यांना पाहायला मिळाली. या दोघांमधील फरक भारताचा यष्टीरक्षक पार्थिव पटेल याने सांगितला.

“विराट हा खूप वेगळ्या पद्धतीचा कर्णधार आहे. त्याला कायम स्पर्धेत पुढे राहायला आवडतं. तो स्वतः संघाच्या अग्रस्थानी उभा राहून खेळाडूंना मार्गदर्शन करतो आणि कायम आक्रमक असतो. आक्रमकता ही त्याची शैली आहे आणि ती शैली त्याला शोभून दिसते”, असे विराटबद्दल बोलताना पार्थिव म्हणाला.

त्याने धोनी आणि रोहितच्या नेतृत्वशैलीबाबतही मत व्यक्त केले. धोनी आणि रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ड्रेसिंग रूम शांत असते, पण विराटच्या नेतृत्वाखाली मात्र ड्रेसिंग रूम मधील सारेच जण सज्ज असतात. धोनी हा एक उत्तम कर्णधार आहे कारण त्याला संघातील साऱ्या खेळाडूंची क्षमता माहिती असते. तसेच प्रत्येकाकडून चांगली कामगिरी कशी करून घ्यायची, हे पण त्याला समजतं. धोनी खेळाडूंना त्यांचा वेळ देतो आणि मैदानात त्यांना नवे प्रयोग करण्याचे स्वातंत्र देतो”, हेदेखील पार्थिवने नमूद केले.