30 मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. 2018 साली देशात आणि परदेशात चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाची नवीन वर्षात, घरच्या मैदानावरील पहिल्याच मालिकेत खराब सुरुवात झाली. अनेक दिग्गज खेळाडूंनी भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठीचा प्रबळ दावेदार असल्याचं मान्य केलं आहे. मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या संघाला ही स्पर्धा जिंकण्याचा दावेदार मानत नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा वन-डे सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहली बोलत होता.

“खरं सांगालयला गेलं तर प्रत्येक संघ हा विश्वचषकामध्ये आमच्यासाठी धोकादायक आहे. ज्याची सुरुवात चांगली होईल त्याला पुढच्या सामन्यांमध्ये थांबवणं सोपं जाणार नाही. त्यामुळे माझ्या मते कोणताही संघ विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार नाहीये. प्रत्येक संघ तितकाच ताकदवान आहे. विंडीजचा संघ सध्या चांगला खेळतोय. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघही सध्या समतोल आहेत. याचसोबत न्यूझीलंडच्या संघातही काही चांगले आणि स्फोटक खेळाडू आहेत. तसेच पाकिस्तानचा संघही कोणत्याही संघाला हरवू शकतो.” विराट कोहली बोलत होता.

अवश्य वाचा – मालिका पराभवानंतर विराटचा सहकाऱ्यांना सल्ला, आयपीएलची मजा घ्या !

यावेळी बोलत असताना कोहलीने, विश्वचषकासाठी भारतीय संघ हा जवळपास निश्चीत झालेला असून, एका जागेसाठी विचार केला जाऊ शकतो असं वक्तव्य केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका 2-0 ने गमावल्यानंतर भारताला वन-डे मालिकेतही 3-2 ने पराभवाचा सामना करावा लागला. 30 मे पासून सुरु होणाऱ्या वन-डे विश्वचषकाआधी भारतीय संघाची ही अखेरची वन-डे मालिका होती. यानंतर भारतीय खेळाडू 23 मार्चपासून आयपीएलमध्ये सहभागी होतील. त्यामुळे विश्वचषकासाठीच्या संघात कोणता खेळाडू आपलं स्थान पक्क करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.