महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीकडे संघाच्या कर्णधारपदाची सूत्र हाती आली. यानंतर विराटने आपल्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर भारतीय संघाचा दबदबा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कायम ठेवला आहे. अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या विराट कोहलीचा आज ३१ वा वाढदिवस आहे. सध्या भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध टी-२० सामन्यांची मालिका खेळतो आहे, मात्र विराट कोहलीला आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेता बीसीसीआयने विश्रांती दिली आहे.

आगामी कसोटी मालिकेतून विराट भारतीय संघात पुनरागमन करेल. विराट कोहलीच्या ३१ व्या वाढदिवसानिमीत्त, त्याच्या कारकिर्दीतले महत्वाचे ३१ टप्पे आज आपण जाणून घेणार आहोत.

१) २००८ साली विश्वचषक जिंकणाऱ्या १९ वर्षाखालील संघाचं नेतृत्व विराट कोहलीने केलं होतं.

२) देवधर चषक स्पर्धेत नेतृत्व करणारा विराट कोहली हा दुसरा तरुण खेळाडू आहे. वयाच्या २१ व्या वर्षी २००९-१० सालात त्याने नॉर्थ झोनचं नेतृत्व केलं होतं.

३) एका दशकात २० हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात विराटने ही कामगिरी करुन दाखवली होती. विंडीजविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात विराटने नाबाद ११४ धावा करत हा विक्रम आपल्या नावे जमा केला.

४) वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १० हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रमही विराटच्याच नावे जमा आहे. २०१८ साली वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद १५७ धावांच्या खेळीदरम्यान त्याने ही कामगिरी केली होती. २०५ डावांमध्ये विराटने ही कामगिरी केली, याआधी सचिन तेंडुलकरला ही कामगिरी करण्यासाठी २५९ डाव लागले होते.

५) एका कॅलेंडर वर्षात वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण करण्याची कामगिरी विराटने करुन दाखवली आहे. कोहलीने ११ डावांमध्ये ही कामगिरी केली होती. त्याने हाशिम आमलाचा १५ डावांचा विक्रम मोडला.

६) २०१८ साली कोहलीने आयसीसीचे सर्वोत्तम कामगिरीसाठी दिले जाणारे सर्व पुरस्कार पटकावले होते. एका वर्षात ३ मानाचे पुरस्कार मिळवणारा विराट एकमेव फलंदाज आहे. विराटला सर गार्फील्ड सोबर्स ट्रॉफी, ICC Test आणि ODI Player of the Year हे पुरस्कार मिळाले होते.

७) दोन प्रतिस्पर्धी संघांविरोधात सलग ३ शतकं झळकावणारा विराट हा पहिला खेळाडू आहे. फेब्रुवारी २०१२ ते जुलै २०१२ या दरम्यान विराटने श्रीलंकेविरोधात नाबाद १३३, १०८ आणि १०६ धावा केल्या होत्या. तर २०१८ सालात विराटने विंडीजविरोधात १४०, नाबाद १५७ आणि १०७ धावा केल्या होत्या.

८) कर्णधार या नात्याने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही विराटच्याच नावे जमा आहे. २०१७ साली विराटने वन-डे क्रिकेटमध्ये १ हजार ४६० धावा पटकावल्या होत्या. याआधी रिकी पाँटींगने २००७ साली १ हजार ४२४ धावा काढल्या होत्या.

९) २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. मात्र विराटने विश्वचषकात सलग ४ वेळा अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८२, पाकिस्तानविरुद्ध ७७, अफगाणिस्तानविरुद्ध ६७ आणि वेस्ट इंडिजविरुद्ध ७२ धावा केल्या होत्या.

१०) सलग ३ वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये कॅलेंडर वर्षात १ हजार धावा करणारा विराट पहिला कर्णधार आहे. २०१६ साली विराटने १ हजार २१५, २०१७ साली विराटने १ हजार ५९ तर २०१८ साली १ हजार ३२२ धावा केल्या होत्या.

११) कसोटी कर्णधार या नात्याने विराटच्या नावावर सर्वाधिक द्विशतकं जमा आहेत.

१२) २०१६ साली आयपीएलमध्ये विराटने ९७३ धावा काढत एका हंगामात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम केला होता.

१३) कर्णधार या नात्याने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३ हजार धावा पूर्ण करणारा विराट पहिला कर्णधार आहे. त्याने ४९ डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली होती.

१४) एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रमही विराटच्या नावे जमा आहे. २०१७ साली विराटच्या नावावर ११ शतकं जमा आहेत.

१५) वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा कर्णधार हा विक्रमही विराट कोहलीच्या नावे जमा आहे. विश्वचषकानंतर विंडीजविरुद्ध मालिकेत विराटने दुसऱ्या वन-डे सामन्यात १२० धावा केल्या होत्या.

१६) २०१८ साली विराट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४ हजार धावा करणारा कर्णधार ठरला होता. ६५ व्या डावात त्याने ही कामगिरी करुन दाखवली. याआधी ब्रायन लाराने ७१ डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली होती.

१७) घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रमही कोहलीच्या नावावर जमा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावलेल्या ८ शतकांपैकी ५ शतकं विराटने घरच्या मैदानावर झळकावलेली आहेत.

१८) वन-डे क्रिकेटमध्ये ३५ शतकांचा टप्पा विराटने सर्वात जलद गाठला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. विराटने १८६ डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली, सचिनला हीच कामगिरी करण्यासाठी २६७ डाव लागले होते.

१९) टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावे जमा आहे. २०१७ साली विराटने टी-२० क्रिकेटमध्ये १ हजार १६ धावा केल्या होत्या. त्याने ब्रँडन मॅक्युलमचा १ हजार ६ धावांचा विक्रम मोडला.

२०) वन-डे क्रिकेटमध्ये सलग ३ शतकं झळकावण्याचा विक्रमही विराटच्या नावे जमा आहे.

२१) ३५० किंवा त्यापेक्षा अधिक धावसंख्येचं लक्ष्य पार करताना विराटचा खेळ बहरतो. आतापर्यंत विराटने ३ वेळा ३५० किंवा त्यापेक्षा जास्त धावसंख्येचं लक्ष्य यशस्वी पार केलं आहे, या तिन्ही सामन्यात विराटने शतक झळकावलं होतं.

२२) विराट कोहलीने २०११ साली टी-२० क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या केविन पिटरसनला पहिल्याच चेंडूवर माघारी धाडलं होतं.

२३) २०११ साली बांगलादेशविरुद्ध सामन्यात विराट कोहली आपला पहिला विश्वचषक सामना खेळला. याचसोबत विराट विश्वचषकात पदार्पण करताना पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.

२४) विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा विराट पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. २०१५ साली झालेल्या स्पर्धेत विराटने पाकविरुद्ध १०७ धावा केल्या होत्या.

२५) सलग दोन विश्वचषकात पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा विराट एकमेव खेळाडू आहे. (२०११ आणि २०१५ चा विश्वचषक)

२६) Bilateral ODI Series मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट अव्वल आहे. २०१८ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत विराटने ५५८ धावा केल्या होत्या.

२७) Bilateral ODI Series मध्ये ५०० धावा करणारा विराट पहिला खेळाडू आहे.

२८) आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम कोहलीच्या नावे जमा आहे. २०१६ साली विराटने आयपीएलमध्ये ४ शतकं झळकावली होती.

२९) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत विराट प्रतिस्पर्धी संघावर सर्वाधिक फॉलोऑन लादणारा भारतीय कर्णधार ठरला. विराटने प्रतिस्पर्ध्यावर फॉलोऑन लादण्याची ८ वी वेळ होती. मोहम्मद अझरुद्दीनने ७ वेळा फॉलोऑन लादला होता.

३०) कर्णधार या नात्याने विराटने सर्वाधिकवेळा १५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

३१) भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटने सचिन आणि सेहवागला मागे टाकलं आहे. विराटच्या नावावर सध्या ७ द्विशतकं जमा आहेत.