भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. मैदानावरील त्याची खिलाडूवृत्ती सर्वांनी पाहिली आहे. मात्र, हाच द्रविड धोनीवर एकदा खूप चिडला होता, असा खुलासा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने केला आहे. एका सामन्यादरम्यान द्रविडने धोनीला फटकारले होते.

वीरेंद्र सेहवाग म्हणाला, ”मी राहुल द्रविडला रागावल्याचे पाहिले आहे. 2006च्या पाकिस्तान दौर्‍यादरम्यान धोनीने चुकीचा फटका खेळला होता आणि त्यानंतर राहुल द्रविड त्याच्यावर खूप रागावला होता. त्यानंतर द्रविड त्याला म्हणाला,” हा मार्ग आहे का? अशा पद्धतीने तू खेळतोस का? तू सामना संपवला पाहिजेस.”

सेहवाग म्हणाला, ”द्रविड ज्या प्रकारे इंग्रजी शब्द वापरत होता, त्याबद्दल मला आश्चर्य वाटले. मला त्यातील अर्धा भाग समजला नाही. जेव्हा पुढच्या वेळी धोनी फलंदाजीला आला, तेव्हा त्याने ते फटके खेळले नाहीत. मी त्याला याचे कारण विचारले असता तो म्हणाला, मला पुन्हा द्रविडचा ओरडा खायचा नाही.”

महेंद्रसिंह धोनीने सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले. त्यानंतर राहुल द्रविड संघाचा कर्णधार झाला आणि एमएस धोनी संघात आला.

द्रविडचा व्हायरल झालेला व्हिडिओ

काही दिवसांपूर्वी राहुल द्रविडचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ म्हणजे क्रेडीट कार्डसंबंधीची जाहिरात असून त्यात राहुल द्रविडचा राग कसा आहे, हे दाखवण्यात आले आहे. वाहतूक कोंडीमुळे राहुल द्रविडला त्याचा राग अनावर होतो आणि तो बाजूच्या गाडीचालवकावर ओरडतो, बॅटने एका गाडीचा आरसा फोडतो असे दाखवण्यात आले आले. ही जाहिरात पाहून विराटने ट्वीट केले आहे. ‘राहूल भाईचे हे रूप याआधी कधी पाहिले नाही’ असे त्याने व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे.