राज्यपाल विद्यासागर राव यांचे आवाहन, विश्वनाथन आनंदला हृदयनाथ पुरस्कार
‘विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने महाराष्ट्रात बुद्धिबळाचा प्रचार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. माझ्या देखरेखीखाली २० विद्यापीठे आहेत. आनंदने बुद्धिबळाचा प्रचार करण्यासाठी आम्हाला काही उपाययोजना सुचवाव्यात, काही कल्पना सांगाव्यात. त्याची अंमलबजावणी आम्ही नक्की करू,’’ असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल के. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले. हृदयेश आर्ट्सच्यावतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. मुंबईच्या हृदयनाथ मंगेशकर नाटय़गृहात मंगळवारी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या विश्वनाथन आनंदला यंदाच्या हृदयनाथ पुरस्कारने गौरविण्यात आले. स्मृतीचषक आणि दोन लाख रुपये अशा या पुरस्काराचे स्वरुप होते. ़
या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपाल विद्यासागर राव यांच्यासह पंडित हृदयनाथ मंगेशकर, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रघुनंदन गोखले, बॉलिवूड अभिनेता आमीर खान आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

मुंबईच्या अनेक संस्मरणीय आठवणी
‘मुंबईशी माझ्या अनेक संस्मरणीय आठवणी जोडल्या आहेत. कारकिर्दीतील पहिले राष्ट्रीय विजेतेपद १९८६ मध्ये मी येथेच जिंकले. त्यानंतर मी जेव्हा पहिले विश्वविजेतेपद पटकावले तेव्हा मुंबईत झालेले स्वागत अविस्मरणीय होते,’ असे मत आनंदने व्यक्त केले.

अन्य पुरस्कारप्राप्त खेळाडू
रघुनंदन गोखले, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते
अनुपमा गोखले, अर्जुन पुरस्कार विजेत्या (बुद्धिबळ)
प्रविण ठिपसे, अर्जुन पुरस्कार (बुद्धिबळ)
भाग्यश्री ठिपसे, अर्जुन पुरस्कार (बुद्धिबळ)
रोहिणी खाडीलकर, अर्जुन पुरस्कार (बुद्धिबळ)
देवेंद्र जोशी,आंतरराष्ट्रीय स्नुकरपटू
अंजली भागवत, आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू
कमलेश मेहता, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू
धनराज पिल्ले, आंतरराष्ट्रीय हॉकीपटू
अरुण केदार, कॅरमपटू
प्रणाली धहारीया, महिला ग्रँडमास्टर
छाया पवार, शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू
चारुदत्त जाधव, आंतरराष्ट्रीय अंध बुद्धिबळपटू
दिलीप पिंगे, क्रिकेटपटू
आदित्य उदेशी, बुद्धिबळपटू