बुद्धिबळामधील पहिल्यावहिल्या ‘ग्लोबल चेस लीग’ची महत्त्वाची सूत्रे सोमवारी टेक महिंद्राने माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदकडे सोपवली आहेत.
जगातील व्यावसायिक बुद्धिबळपटूंचा समावेश असलेले आठ संघ यात समाविष्ट असतील. प्रत्येक संघात पुरुष, महिला आणि कनिष्ठ खेळाडूंचा समावेश असेल. राऊंड रॉबिन लीग पद्धतीने हे सामने होणार असून, स्पर्धेचा आराखडा येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल, असे संयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
‘‘जागतिक दर्जाच्या लीगकरिता संयोजनाची जबाबदारी भारताकडे आहे, हा वैयक्तिक अभिमानाचा क्षण आहे,’’ असे आनंदने सांगितले. या स्पर्धेसाठी भारतीय ग्रँडमास्टर आनंदकडे सल्लागार, भागीदार, मागदर्शक आणि लीगला आकार देण्याच्या जबाबदाऱ्या असतील.
‘‘बुद्धिबळात अद्याप जगभरात न वापरलेली क्षमता आहे. नुकत्याच झालेल्या ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. या खेळावर आधारित टीव्ही मालिकाही लोकप्रियता मिळवत आहेत,’’ असे महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.