विश्वविजेतेपदाच्या लढतीसाठी आपली तयारी योग्य झाल्याचे विश्वनाथन आनंदने पहिल्या लढतीतच दाखवून दिले होते. पण मंगळवारी रंगलेल्या चुरशीच्या लढतीत आनंदने काळ्या मोहऱ्यांसह खेळतानाही नॉर्वेचा आव्हानवीर मॅग्नस कार्लसनला धोक्याचा इशारा दिला. विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीतील तिसरा डावही बरोबरीत सुटला. त्यामुळे तिसऱ्या डावाअखेर दोघांकडे प्रत्येकी १.५ गुण झाले आहेत.
पहिले दोन डाव कोणत्याही उत्कंठेशिवाय रंगल्यामुळे बुद्धिबळप्रेमींना जगातील दोन अव्वल बुद्धिबळपटूंकडून चुरशीच्या लढतीची अपेक्षा होती. ५१ चालींपर्यंत रंगलेल्या तिसऱ्या डावांत अखेर बरोबरी पत्करून ‘पिक्चर अभी बाकी है’, याची आनंदने झलक दाखवून दिली. तिसऱ्या डावातही शांत सुरुवात केल्यानंतर डावाच्या मध्यात आनंदने सुरेख चाली रचून कार्लसनसमोर आव्हान निर्माण केले होते. पण कार्लसनने बचावात्मक पवित्रा अवलंबत परिस्थिती नियंत्रणात आणली. आतापर्यंत तिन्ही डाव बरोबरीत सुटले असून दोन्ही खेळाडूंनी आपापली अस्त्रे बाहेर काढली नाहीत. त्यामुळे पुढील डावांत दोन्ही खेळाडूंचा बहारदार खेळ मिळण्याचे संकेत मिळत आहेत. आता बुधवारी होणाऱ्या चौथ्या डावात आनंदला पांढऱ्या मोहऱ्यांसह आक्रमण करण्याची संधी मिळणार आहे.
कार्लसनने पुन्हा एकदा रेटी पद्धतीने डावाची सुरुवात करण्यावर भर दिला. पण तरीही पटावर अनेक बदल होणे शक्य होते. राजाला सुस्थितीत ठेवण्याऐवजी कार्लसनने वजिराकडे जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे डावाच्या मध्यात खेळाला कलाटणी मिळाली. पण आनंद मात्र सावध पवित्र्यात होता. आनंदने प्रत्येक चालीत कार्लसनच्या वजिराला माघार घ्यायला लावली. पुढील धोका लक्षात घेऊन कार्लसनने बचावात्मक खेळावर भर दिला. बचावात्मक खेळाने तारल्यामुळे कार्लसनला डावात पुनरागमन करता आले. त्यानंतर सामना सहज बरोबरीत सोडवण्याइतकी परिस्थिती कार्लसनने तयार केली होती. अखेरीस दोघांचेही राजा आणि प्रत्येकी एक उंट शिल्लक राहिले असताना खेळ लांबला जाऊ शकतो, हे आनंदच्या लक्षात आले होते.
“डावाच्या मध्यात धोकादायक परिस्थिती उद्भवली होती. ती आणखीन गंभीर होऊ शकली असती. मी काहीशा छोटय़ा चुका केल्यामुळे ही परिस्थिती ओढवली. वेळीच खेळावर नियंत्रण मिळवल्यामुळे धोका टळता आला.”
मॅग्नस कार्लसन