फॅबिआनो कारूआनाविरुद्धचा डाव अनिर्णीत
माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पध्रेत सलग दोन पराभवांनंतर पुन्हा एकदा बरोबरीवर समाधान मानावे लागले. आठव्या डावात अमेरिकेच्या फॅबिआनो कारूआनाने त्याला बरोबरीत रोखले.
हॉलंडच्या अनिश गिरीने अनपेक्षित मुसंडी मारताना अमेरिकेच्या हिकारू नाकामुरावर विजय मिळवला. या विजयाबरोबर त्याने अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या मॅक्सिमे व्हॅचिएर-लॅग्रेव्हेशी बरोबरी केली. आठव्या फेरीत हा एक विजय सोडल्यास सर्व सामने बरोबरीत सुटले. विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला बल्गेरियाच्या व्हॅसेलीन टोपालोव्हचा बचाव भेदण्यात अपयश आले आणि म्हणून त्याला अध्र्या गुणावर समाधान मानावे लागले. अर्मेनियाच्या लेव्हॉन अ‍ॅरोनियन आणि अलेक्झांडर ग्रिस्चुक यांच्यातील सामनाही अनिर्णीत राहिला.
गिरी आणि व्हॅचिएर-लॅग्रेव्हे यांची प्रत्येकी पाच गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे, तर ४.५ गुणांसह कार्लसन, अ‍ॅरोनियन आणि ग्रिस्चुक तिसऱ्या स्थानावर आहेत. करुआना व इंग्लंडचा मिचल अ‍ॅडम्स यांच्या खात्यात प्रत्येकी ४ गुण आहेत. आनंद नवव्या स्थानावर असून टोपालोव्ह दहाव्या स्थानावर आहे.