ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज असल्याचा इशाराच अजिंक्य रहाणेने नाबाद शतकी खेळीने दिला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात भारत ‘अ’ संघाने रविवारी पहिल्या दिवशी ८ बाद २३७ धावा केल्या.

कर्णधार रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय सुरुवातीला अपयशी ठरला. पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल हे सलामीवीर भोपळाही फोडू शकले नाहीत, तर हनुमा विहारी १५ धावांवर बाद झाल्यामुळे भारत ‘अ’ संघाची ३ बाद ४० अशी केविलवाणी अवस्था झाली. परंतु रहाणे (२२८ चेंडूंत १६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १०८ धावा) आणि चेतेश्वर पुजारा (५४) यांनी चौथ्या गडय़ासाठी ७६ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. जेम्स पॅटिन्सनने पुजाराचा अडसर दूर केल्यानंतर रहाणेने कुलदीप यादवच्या (१५) साथीने पाचव्या गडय़ासाठी ६९ धावांची भागीदारी रचली. ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाकडून पॅटिन्सनने टिच्चून गोलंदाजी करताना ५८ धावांत तीन बळी मिळवले, तर मायकेल नीसीर आणि ट्रॅव्हिस हेड यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.