ओव्हलच्या मैदानावर सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर मात करत कसोटी मालिका ४-१ ने जिंकली. अखेरच्या सामन्यातही लोकेश राहुल आणि ऋषभ पंतचा अपवाद वगळता एकही फलंदाज आश्वासक कामगिरी करु शकला नाही. मात्र शेवटच्या दिवसाच्या खेळात इंग्लंडच्या आदिल रशिदने टाकलेला चेंडू सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

शतकवीर लोकेश राहुल आणि ऋषभ पंत यांची जोडी फोडण्याचं महत्वाचं काम आदिल रशिदने केलं. लेग स्टम्पच्या बाहेर टप्पा पडलेला आदिल रशिदचा चेंडू हा इतका आत वळला की त्याचा अंदाज घेणंच राहुलला जमलं नाही, आणि काही क्षणांमध्येच राहुल त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. रशिदच्या या चेंडूने अनेकांना ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्नच्या गोलंदाजीची आठवण झाली. सोशल मीडियावर सध्या या चेंडूची चर्चा ‘Ball of 21st Century’ अशी होत आहे.

इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या ४६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी पुन्हा कोलमडली. यानंतर लोकेश राहुल आणि ऋषभ पंत यांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने ३०० धावांचा टप्पा ओलांडला. लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर मात्र भारताचा डाव पुन्हा एकदा कोलमडला आणि ३४५ धावांमध्ये सर्व संघाला माघारी धाडत इंग्लंडचे आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.