|| ऋषिकेश बामणे, लोकसत्ता
प्रमोद भगत,  पॅरालिम्पिक बॅडमिंटनपटू
मुंबई : टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत जिंकलेले ऐतिहासिक सुवर्णपदक देशाच्या युवा पिढीला त्यांच्या आवडत्या क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रेरणा देईल, असा आशावाद भारताचा सुवर्णपदक विजेता बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने व्यक्त केला.

बॅडमिंटनचा यंदा प्रथमच पॅरालिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या प्रमोदने या क्रीडा प्रकारात भारतासाठी पुरुष एकेरीत पहिले सुवर्णपदक पटकावण्याची किमया साधली. यंदाच्या पॅरालिम्पिकमधील भारताच्या सर्व क्रीडापटूंची विक्रमी कामगिरी, टाळेबंदीदरम्यान आलेले अडथळे आणि भविष्यातील आव्हानांबाबत अर्जुन पुरस्कार विजेत्या प्रमोदशी केलेली ही खास बातचीत-

’ पॅरालिम्पिक सुवर्णपदक जिंकल्यानंतरच्या अनुभवाचे कशाप्रकारे वर्णन करशील?

गेले काही दिवस मी आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांचा अनुभव घेत आहे. २०२०मध्ये पॅरालिम्पिक रद्द झाल्यावर यावर्षीसुद्धा स्पर्धेबाबत साशंका होती. परंतु ज्यावेळी आम्ही टोक्योला रवाना होण्यासाठी विमानात बसलो, तेव्हा स्पर्धा होणारच ही मनाला खात्री पटली. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच माझ्याकडून चाहत्यांना पदकाच्या अपेक्षा आहेत, हे ठाऊक होते. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात यशस्वी ठरल्याचा आनंद आहे. राष्ट्रगीत गाताना देशाचा तिरंगा उंचावताना पाहून मला अश्रू अनावर झाले. आई-वडिलांच्या शुभेच्छांनी मी भारावून गेलो. पंतप्रधान आणि क्रीडामंत्र्यांनीही वेळोवेळी प्रोत्साहन दिले. प्रशिक्षक आणि चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले.

’ पॅरालिम्पिकमधील भारताच्या एकंदर कामगिरीविषयी आणि स्पर्धेला लाभलेल्या चाहत्यांच्या प्रतिसादाविषयी तुला काय वाटते?

भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी २०२१ हे वर्ष लाभदायी ठरले. विशेषत: ऑलिम्पिकनंतर पॅरालिम्पिकचीही समाजमाध्यमांवर चर्चा रंगली. पाच सुवर्णांसह एकूण १९ पदकांची कमाई करणे खरेच कौतुकास्पद होते. आमच्या यशामुळे भविष्यातही पॅरा-क्रीडापटूंच्या कामगिरीची दखल घेतली जाईल. बॅडमिंटनचा प्रथमच पॅरालिम्पिकमध्ये समावेश करण्यात आल्याने माझे पदक मी देशाच्या प्रत्येक युवकाला समर्पित करतो. त्यांना माझ्या कामगिरीद्वारे स्वत:च्या आवडीच्या क्षेत्रात यशाची शिखरे सर करण्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी आशा आहे.

’ टाळेबंदीच्या काळात स्वत:चे मानसिक आणि शारीरिक संतुलन कसे राखले?

गेल्या मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागू झाल्यानंतर सुरुवातीला सर्वांनाच समस्या जाणवल्या. परंतु सुदैवाने मला इतक्या अडचणींचा सामना करावा लागला नाही. प्रारंभीच्या महिन्याभरानंतर लखनौ येथील अकादमीत सराव केल्याने माझी पॅरालिम्पिकच्या दृष्टीने तयारी सुरू होती. मानसिक संतुलनासाठी प्रशिक्षक आणि अन्य सहकाऱ्यांशी मी सातत्याने संवाद साधायचो. यादरम्यान शासनाकडूनही साहाय्य मिळाले. फक्त गतवर्षी पॅरालिम्पिक रद्द झाल्याने काहीशी भीती निर्माण झाली होती. परंतु यंदा ही स्पर्धा सुरळीतपणे झाल्याने मी आनंदी आहे.

’ देशातील अपंग क्रीडापटूंच्या पायाभूत सुविधांविषयी तुला काय वाटते?

निश्चितच गेल्या काही वर्षांत अपंग क्रीडापटूंच्या पायाभूत सुविधांमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. मात्र खेळाडूंना योग्य त्या वेळी खेळण्यासाठी मैदाने आणि स्टेडियम उपलब्ध असणेही तितकेच गरजेचे आहे. यासाठी शासनाने देशाच्या प्रत्येक राज्यातील खेड्यापाड्यात पोहोचले पाहिजे. प्रत्येक स्टेडियममध्ये अपंग क्रीडापटूंसाठी खास सुविधा करण्यात आली, तर त्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल आणि आपल्याला युवा वयोगटातूनच असंख्य पदकविजेते क्रीडापटू गवसतील, याची मला पूर्ण खात्री आहे.

’ आता कोणते लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहेस?

सध्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धा नसल्याने मी पॅरालिम्पिक सुवर्णपदकाचा आनंद लुटण्यातच पुढील काही दिवस व्यग्र असेन. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये नव्या जोमाने सरावाला लागेन. २०२२मध्ये चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे ध्येय मी बाळगले आहे.