IND vs WI : हैदराबाद येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली असून पहिल्या दिवसअखेर विंडिजने ७ बाद २९५ धावा केल्या. नाणेफेक जिंकून विंडिजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सत्रात विंडीजने ३ गडी गमावून ८६ धावा केल्या होत्या. सलामीवीर क्रेग ब्रेथवेट आणि कायरन पॉवेल या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. पण नंतर दोघेही झटपट बाद झाले. पॉवेल २२ तर ब्रेथवेट १४ धावांवर तंबूत परतला. पॉवेलला अश्विनने झेलबाद केले तर ब्रेथवेटला कुलदीप यादवने अप्रतिम फिरकी टाकून जाळ्यात अडकवले. त्यानंतर काही काळ संयमी खेळी करून शाय होपही माघारी परतला. उमेश यादवने त्याला पायचीत केले.

दुसऱ्या सत्रात हेटमेयर १२ धावांवर आणि अम्बरीस १८ धावांवर झटपट बाद झाले. या दोघांना कुलदीप यादवने बाद केले. त्यानंतर डावरीचने काही काळ संघर्ष केला, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तो ३० धावा करून बाद झाला. त्याला उमेश यादवने पायचीत केले.

तिसऱ्या सत्रात मात्र विंडीजच्या होल्डर – चेस जोडीने भारताच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. या दोघांनी शतकी (१०४) भागीदारी केली. अर्धशतकी खेळी केल्यानंतर कर्णधार जेसन होल्डर ५२ धावांवर बाद झाला. उमेश यादवने त्याला तंबूत धाडले. पण चेसने एका बाजूने किल्ला लढवला. सध्या चेस शतकापासून २ धावा दूर आहे. तर देवेंद्र बिशू २ धावांवर खेळत आहे.