धोनी युग सुरू झाल्यापासून भारतातील क्रिकेटप्रेमींना विजयाची सवय लावणाऱया टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱयामध्ये पुरती निराशा केली. देशातील खेळपट्ट्यांवर ‘हिरो’ आणि परदेशात ‘झिरो’ ही गत धोनी ब्रिगेडची का होते, यावर टाकलेला प्रकाशझोत…
१. मेहनती सराव, पण फळ मिळण्यास अपूरा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ आफ्रिकेत लवकर दाखल झाला. इतकेच नव्हे, तर धोनीच्या सूचक कल्पनेने एकदिवसीय सामन्यांनंतरच्या कसोटी सामन्यांसाठी तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कसोटी संघातील महत्त्वाच्या खेळाडूंनाही त्याचवेळी दौऱयावर पाठविण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. अपेक्षेप्रमाणे धोनी ब्रिगेडने आफ्रिकेत पोहोचल्यावर पहिल्याच दिवशी कसून सराव केला. परंतु, उसळी चेंडूंचा सामना करणारा सराव कमकुवतच ठरला. भारतातील फलंदाजीला पोषक खेळपट्ट्यांवर टीम इंडियाला उसळी चेंडूंचा सराव होणे कठीण हेही तितकेच खरे. पण, आफ्रिकेसारख्या देशांमधील उसळी घेणाऱया खेळपट्ट्या भारतात तयार करणे अशक्य आहे, असेही नाही.
२. भारतीय गोलंदाजी ‘घरकी मुर्गी दाल बराबर’
भारतीय खेळपट्टीवर आत्मविश्वाने होणारी गोलंदाजी आफ्रिकेत संपूर्णपणे फोल ठरली. भारतात ‘आऊट स्विंग’च्या जोरावर वेस्ट इंडिजच्या स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला बाद करणाऱया भुवनेश्वर कुमारच्या ‘आऊट स्विंग’ची धार आफ्रिकेच्या नवख्या क्विंटन डी कॉक या डावखुऱया फलंदाजाला भेदू शकली नाही.
फिरकी गोलंदाजांनीही आफ्रिकेच्या फलंदाजांसमोर नांगीच टाकल्याचे दिसले. त्यातल्या त्यात मोहम्मद शमीला सरासरी विकेट्स मिळाल्या. पंरतु, त्यानेही उत्तम कामगिरी केली, असे म्हणण्यासारखे नाही. एकंदर घरच्या खेळपट्टीवर आत्मविश्वाने गोलंदाजी करणाऱया भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेत ‘घरकी मुर्गी दाल बराबर’ हे सिद्ध करुन दाखविले, असेच म्हणावे.
३. फलंदाजांचा ‘फुसका बार’; मधली पट्टी ढासळली
आफ्रिकन गोलंदाजीवर भारतीय फलंदाजांच्या मर्यादा या मालिकेत स्पष्ट झाल्या. त्यात भारताच्या मधल्यापट्टीतील फलंदाजांची कामगिरी ढासळल्याचे कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही कबुल केले. सुरेश रैना आणि युवराज सिंग यांच्या फलंदाजीच्या फॉर्मबाबत धोनीने चिंता प्रकट केली. तर उसळी गोलंदाजीचा सामना करताना तंत्राचा अभाव असल्याचे रोहीत शर्माने खंडन करून तंत्राचा नाही, भागीदारीची कमतरता जाणवली असे म्हटले. सामन्यात एक शंभरी आणि किमान दोन पन्नास धावांची भागीदारी होण्याची गरज होती. परंतु, ती झाली नाही असे रोहित म्हणाला खरा, पण एकंदर फलंदाजांची भागीदारी ही त्यांच्या कामगिरीवरच अवलंबून असते. खेळपट्टीवर उभे राहून योग्य फटकेबाजी करत राहणे फलंदाजाच्या हातात असते आणि त्यासाठी योग्य फलंदाजी तंत्राचीच गरज असते. दक्षिण आफ्रिका दौऱयात भारतीय फलंदाजांना उसळी चेंडूचा सामना काय तर ते सांभाळता ही आले नाहीत. हे स्पष्ट आहे.