देखभाल खर्च परवडणार नसल्याच्या कारणावरून भारताची जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर हिने तिला मिळालेली ‘बीएमडब्ल्यू’ कार परत करण्याचा निर्णय घेतला असताना दीपाच्या बीएमडब्ल्यूच्या देखभाल खर्चावर तोडगा काढण्याची तयारी हैदराबाद जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष चामुंडेश्वरीनाथ यांनी दर्शविली आहे. दीपाशी याबाबत चर्चा करून तिला जे योग्य आणि सोयीस्कर ठरेल असा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती चामुंडेश्वरीनाथ यांनी दिली.

रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याच्या पार्श्वभूमीवर दीपा कर्माकर हिला चांमुडेश्वरीनाथ यांनी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर याच्या हस्ते ‘बीएमडब्ल्यू’ कार भेट म्हणून दिली होती. दीपा कर्माकर सोबतच पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक यांनाही कार भेट म्हणून देण्यात आल्या होत्या. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सचिन तेंडुलकर भारतीय पथकाचा सदिच्छादूत होता. त्यामुळे रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंना सचिनच्या हस्ते २८ ऑगस्ट रोजी गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत घेण्यात आलेल्या सोहळ्यात ‘बीएमडब्ल्यू’ कार भेट म्हणून देण्यात आली होती.

वाचा: दिपा कर्माकर ‘बीएमडब्ल्यू’ परत करणार, देखभालीचा खर्च न परवडणारा!

देशात जिम्नॅस्टिक खेळासाठी चांगले वातावरण निर्माण करणाऱ्या दिपाला आणि तिच्या कुटुंबियांना या महागड्या गाडीचा देखभाल खर्च न परवडणारा आहे. तसेच अगरताळामधील छोट्या आणि खराब रस्त्यावरून ही आलिशान गाडी चालविणे जिकरीचे आहे. त्यामुळे ही गाडी परत करण्याचा निर्णय दिपाने आणि तिच्या कुटुंबियांनी घेतला असल्याची माहिती पुढे आली आहे.