स्पॉटफिक्सिंगप्रकरणी दोषी आढळलेल्या फिरकीपटू अजित चंडिलावर बीसीसीआयने आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला. बंदीच्या शिक्षेविरोधात बीसीसीआयला पुनर्विचार करण्याची विनंती करणार असल्याचे चंडिलाने सांगितले, मात्र शिक्षेविरोधात न्यायालयात दाद मागणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने चंडिलावर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला होता.
मी आणि माझे कुटुंबीय या निर्णयाने नाराज आहोत. क्रिकेट हा माझा धर्म आहे. आजीवन बंदीसारखा कठोर निर्णय जाहीर होईल याची मी कल्पनाही केली नव्हती. म्हणूनच शिक्षेविरोधात पुन्हा विचार करण्याची विनंती बीसीसीआयला करणार आहे असे चंडिलाने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘आदरणीय न्यायालय आणि बीसीसीआय यांच्यात श्रेष्ठ कोण, असा विषयच नाही. बीसीसीआय आणि न्यायालय यांची स्वतंत्र तत्त्वे आहेत. बीसीसीआय विनंतीचा विचार करेल अशी आशा आहे. बीसीसीआयला विनंती केल्यानंतर प्रतीक्षा करेन आणि त्यानंतर भविष्याबाबत निर्णय घेईन.’