चॅम्पियन्स लीग फुटबॉल

उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्याच्या लढतीत उभय संघ आज आमनेसामने; १९ वर्षीय डी’लिटवर सर्वाच्या नजरा

लुका मॉड्रिच, टॉनी क्रूस, गॅरेथ बेल यांसारख्या नामांकित खेळाडूंचा भरणा असलेल्या रेयाल माद्रिदवर सरशी, त्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या युव्हेंट्स संघाला पराभवाचा धक्का देणाऱ्या आयएक्सने यंदाच्या चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये स्वप्नवत कामगिरी केली आहे. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्री रंगणाऱ्या उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्याच्या सामन्यात टॉटेनहॅम हॉटस्पर त्यांचा अश्वमेध रोखणार का, याकडे संपूर्ण फुटबॉल विश्वाचे लक्ष लागले आहे.

१८ एप्रिल रोजी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत आयएक्सने ३-२ अशा एकूण गोलसंख्येच्या बळावर युव्हेंट्सला पराभवाची धूळ चारून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. किशोरवयीन मॅथिग्स डी’लिट, व्हॅन डे बीक आणि यंदाच्या हंगामात आतापर्यंत सहा गोल करणाऱ्या दुसान टॅडिक यांच्यावर आयएक्सच्या आक्रमणाची प्रामुख्याने मदार आहे. डी’लिटने युव्हेंटसविरुद्ध विजयी गोल केला होता, तर टॅडिकने रेयाल माद्रिदविरुद्ध चमकदार कामगिरी करून दाखवली. त्यातच गेल्या आठवडय़ाभरात आयएक्सने एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्यांचे खेळाडू नव्या दमाने मैदानात उतरतील.

दुसरीकडे टॉटेनहॅमने रोमहर्षक उपांत्यपूर्व सामन्यात मँचेस्टर सिटीला त्यांच्या मैदानावर केलेल्या अधिक गोलमुळे ४-४ अशा बरोबरीनंतरही उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. सन होऊंग मिनने सिटीविरुद्ध दोन गोल करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्याच्याकडून पुन्हा एकदा संघाला त्याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असेल. त्याशिवाय ख्रिस्टियन एरिक्सन, डेले अलीवर या नामांकित खेळाडूंवर संघाच्या आक्रमणाची धुरा राहील. गोलरक्षक ह्य़ुगो लॉरिसचा बचाव भेदणे आयएक्ससाठी आव्हानात्मक असेल. एकूणच या सामन्यात कोण बाजी मारेल, याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.

 

२२ १९९७ नंतर २२ वर्षांनी प्रथमच आयएक्स चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे.

आयएक्स आणि टॉटेनहॅम यापूर्वी १९८१मध्ये युरोपियन चषकात एकमेकांविरुद्ध खेळले असून या दोन्ही वेळेस टॉटेनहॅमने बाजी मारली होती.

१७ चॅम्पियन्स लीगच्या गेल्या १८ लढतींपैकी १७ सामन्यांत आयएक्सने अपराजित्व कायम राखले आहे. त्यामुळेच टॉटेनहॅमला त्यांच्याविरुद्ध सावध खेळ करावा लागणार आहे.

संभाव्य संघ (११ खेळाडू)

आयएक्स : आंद्रे ओनाना, डॉमिनिक कोटास्की, व्हॅन ब्लेडेरेन, एरस्मस ख्रिस्टेन्सन, जोएल व्हेल्टमन, मॅथिग्स डी’लिट, व्हॅन डे बीक, डेली ब्लाइंड, पीर शूर्स, डेव्हिड नर्स, दुसान टॅडिक.

टॉटेनहॅम : डेव्हिडसन सँचेझ, ह्य़ुगो लॉरिस, किरन ट्रिपियर, डेले अली, लुकास मॉरा, ख्रिस्टियन एरिक्सन, हॅरी विंक्स, डॅनी रोज, व्हिक्टर वनायमा, टॉबी अल्डेरविरल्ड, जॅन व्हर्तोघेन.

 सामन्याची वेळ : मंगळवारी मध्यरात्री १२.३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी टेन २