नदाल, डेल पोत्रो यांची उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

महिला टेनिसमधील दोन मातब्बर खेळाडू सेरेना व व्हीनस या विल्यम्स भगिनींच्या एकमेकींविरुद्धच्या कारकीर्दीतील ३०व्या लढतीत अनुभवी सेरेनाने सहज बाजी मारत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. याव्यतिरिक्त, महिला एकेरीत गतविजेत्या स्लोन स्टीफन्स, एलिना स्विटोलिना यांनीसुद्धा आगेकूच केली, तर पुरुष एकेरीत राफेल नदाल, जुआन मार्टिन डेल पोत्रो यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

३६ वर्षीय सेरेनाने १६व्या मानांकित व्हीनसवर ६-१, ६-२ अशी मात केली. या विजयामुळे ३० लढतींनंतर सेरेना आणि व्हीनस यांच्यातील आकडेवारी १८-१२ अशी झाली आहे. तृतीय मानांकित स्टीफन्सने व्हिक्टोरिया अझारेंकावर ६-३, ६-४ असा विजय मिळवला. सातव्या मानांकित स्विटोलिनाने वँग कियांगला ६-४, ६-३ अशी धूळ चारली.

पुरुष एकेरीत अग्रमानांकित व जागतिक टेनिस क्रमवारीत प्रथमस्थानी असलेल्या नदालने रशियाच्या कॅरेन खाचानोव्हवर ५-७, ७-५, ७-६ (९-७), ७-६ (७-३) अशी संघर्षपूर्ण सामन्यात मात केली. तृतीय मानांकित डेल पोत्रोने अँडी मरेला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या फर्नाडो व्हर्डास्कोवर ७-५, ७-६, ६-३ अशी सरशी साधली. याव्यतिरिक्त, जॉन इस्नर आणि डोमनिक थीम यांनीसुद्धा उपउपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला.

बोपण्णाची विजयी वाटचाल सुरूच

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचा पुरुष दुहेरीतील सुवर्णपदक विजेता टेनिसपटू रोहन बोपण्णा व त्याचा सहकारी रॉजर वॅसलिन यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठताना मॅथ्यू एबडन व जॅकसन विथ्रो यांचा ६-४, ६-४ असा पराभव केला.