फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदानंतर ग्रास कोर्टवर आपली मक्तेदारी सिद्ध करण्यासाठी आतूर राफेल नदालने संघर्षपूर्ण विजय मिळवत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत आगेकूच केली. अन्य लढतींना मात्र पावसाचा फटका बसला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नदालच्या सामन्याचा आनंद  घेतला.
पहिला सेट गमावल्यानंतर बहारदार खेळ करीत विम्बल्डन टेनिस स्पर्धेत चौथी फेरी गाठली. त्याने कझाकिस्तानच्या मिखाईल कुकुश्किन याच्यावर ६-७ (४-७), ६-१, ६-१, ६-१ अशी मात केली. दरम्यान पावसामुळे या स्पर्धेतील सामन्यांचे वेळापत्रक कोलमडले.
नदाल याच्याविरुद्ध मिखाईल याने पहिल्या सेटमध्ये झुंजार खेळ केला. त्याने हा सेट टायब्रेकपर्यंत लांबविला. टायब्रेकरमध्ये मिखाईल याने परतीच्या बहारदार फटक्यांचा उपयोग करीत नदालची सव्‍‌र्हिस तोडण्यात यश मिळविले.
हा सेट त्याने ५६ मिनिटांमध्ये जिंकला. त्याने फोरहँडच्या फटक्यांचा सुरेख खेळ केला. दुसऱ्या सेटमध्ये नदाल याला सूर गवसला. त्याने सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण मिळविले. त्याने दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक नोंदविला. हा सेट घेत त्याने सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. तिसऱ्या सेटमध्ये त्याने बेसलाईवरून बहारदार खेळ केला. हा सेट त्याने ६-१ असा घेत सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. हा सेट जिंकल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला. त्याने हा सेटही ६-१ असा जिंकला व सामन्यात २-१ अशी आघाडी मिळविली. चौथ्या सेटमध्येही नदालने निर्विवाद वर्चस्व गाजविले. त्याने क्रॉसकोर्ट फटक्यांचा सुरेख खेळ केला. हा सेट त्याने ६-१ याच फरकाने जिंकून सामन्यातही विजय मिळविला.
नदालचा सामना आच्छादित टेनिस सभागृहात असल्यामुळे त्याच्या सामन्यात अडथळा आला नाही.