बुचर्डच्या डोक्याला दुखापत
विजेतेपदाचे कडवे दावेदार मानल्या जाणाऱ्या द्वितीय मानांकित रॉजर फेडरर व तृतीय मानांकित अँडी मरे यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील चौथ्या फेरीकडे धडाक्यात वाटचाल केली. महिलांमध्ये कॅनडाची सौंदर्यवती खेळाडू ईगेनी बुचर्डच्या डोक्याला दुखापत झाली.
अमेरिकन ग्रँड स्लॅम स्पर्धा पाच वेळा जिंकणाऱ्या फेडररने जर्मनीच्या फिलिप कोहेलश्रेबरवर ६-३, ६-४, ६-४ असा दणदणीत विजय मिळविला. या स्पध्रेत २०१२ मध्ये विजेतेपद जिंकणाऱ्या मरेने ब्राझीलच्या थॉमस बेलुसीचे आव्हान ६-३, ६-२, ७-५ असे संपुष्टात आणले. मरेचा या स्पर्धेतील ४०वा विजय आहे. ३४ वर्षीय फेडररला चौथ्या फेरीत १३वा मानांकित जॉन इस्नेरचे आव्हान आहे. त्याने या स्पर्धेत १५व्यांदा चौथी फेरी गाठली आहे. मात्र २००९नंतर त्याला या स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आलेली नाही.
मरेला चौथ्या फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनशी खेळावे लागणार आहे. केव्हिनने चुरशीच्या लढतीत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएम याच्यावर ६-३, ७-६ (७-३), ७-६ (७-३) अशी मात केली.
फ्रेंच विजेत्या स्टॅनिस्लास वॉवरिन्कने आगेकूच करताना बेल्जियमच्या रुबेन बेम्मेल्मन्सवर ६-३, ७-६ (७-५), ६-४ असा विजय मिळविला. वॉवरिन्कपुढे अमेरिकन खेळाडू डोनाल्ड यंगचे आव्हान असणार आहे. डोनाल्डने रंगतदार लढतीत सर्बियाच्या व्हिक्टर ट्रोईसकीला ४-६, ०-६, ७-६ (७-३), ६-२, ६-४ असे हरवले. चेक प्रजासत्ताकच्या टॉमस बर्डीचने स्पेनच्या गुर्लिमो गार्सिया लोपेझचा ६-७ (२-७), ७-६ (९-७), ६-३, ६-३ असा पराभव केला. त्याला रिचर्ड गास्केटशी झुंज द्यावी लागणार आहे. गास्केटने एकतर्फी लढतीत बर्नार्ड टॉमिकला ६-४, ६-३, ६-१ असे हरवले.
महिलांच्या लॉकर रूममध्ये बुचर्ड ही घसरून पडली व तिच्या डोक्याला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर नसली तरी वैद्यकीय तज्ज्ञांनी तिला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तिचा या स्पर्धेतील सहभाग अनिश्चित झाला आहे.
२०व्या मानांकित व्हिक्टोरिया अझारेन्काने ११व्या मानांकित अँजेलिक केर्बरवर सनसनाटी विजय मिळवला. तीन तास चाललेली ही लढत व्हिक्टोरियाने ७-५, २-६, ६-४ अशी जिंकली. उत्कंठापूर्ण लढतीत केर्बरने पाच वेळा मॅच पॉइंट वाचवले. मात्र सहाव्यांदा व्हिक्टोरियाने यश मिळविले. पहिल्या सेटमध्ये २-५ अशा पिछाडीवरून तिने सलग पाच गेम्स जिंकले. तिने वेगवान पासिंग शॉट्स व बिनतोड सव्‍‌र्हिस असा बहारदार खेळ केला.
सिमोना हॅलेपने अमेरिकन खेळाडू शेल्बी रॉजर्सचा ६-२, ६-३ असा धुव्वा उडवला, तर सॅबिनी लिसिकीने चेक प्रजासत्ताकच्या बार्बरा स्ट्रायकोव्हावर ६-४, ४-६, ७-५ असा विजय मिळवला. दोन वेळा विम्बल्डन जिंकणाऱ्या पेत्रा क्विटोव्हाने स्लोवाकियाच्या अ‍ॅना कॅरोलिना श्मिडोलोव्हावर ६-२, ६-१ अशी सहज मात केली. समंथा स्टोसूरने इटलीच्या सारा इराणीला ७-५, २-६, ६-१ असे पराभूत केले. फ्लेविया पेनेट्टाने अपराजित्व राखताना पेत्रा सेटकोवस्काचा १-६, ६-१, ६-४ असा पराभव केला.

घणाघाती फटके हेच फेडररच्या यशाचे गमक

अमेरिकन स्पर्धा सहाव्यांदा जिंकण्यासाठी उत्सुक असलेल्या रॉजर फेडररने येथे आतापर्यंत केलेल्या वाटचालीचे श्रेय त्याला गवसलेल्या आक्रमक फटकेबाजीला द्यावे लागेल. प्रतिस्पर्धी खेळाडूला बचावाची फारशी संधी द्यायची नाही, हे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवत दाहक फटके मारणे, हे तंत्र फेडररला गवसले आहे. दुसऱ्या सव्‍‌र्हिसवर परतीचा फटका मारताना हे तंत्र वापरण्यावर त्याची भिस्त आहे. याबाबत फेडरर म्हणाला, ‘‘तुम्ही या फटक्यास तलवारबाजी म्हणा किंवा विद्युल्लतेचा फटका म्हणा, अर्थात हे तंत्र मला गवसले आहे ते अथक परिश्रमामुळेच. सहाव्यांदा विजेतेपद मिळवण्यासाठी आपल्या खेळात आणखी विविधता पाहिजे. म्हणूनच मी या फटकेबाजीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.’’