वेस्ट इंडिजचा झंझावाती फलंदाज अशी ओळख असलेल्या ख्रिस गेलने २०१९ च्या विश्वचषकानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (ODI) निवृत्ती जाहीर आहे. वेस्ट इंडिजची इंग्लंड विरोधातील एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारीच ख्रिस गेलने ही घोषणा केली. वेस्ट इंडिज क्रिकेटनेही ट्विटरवरून ख्रिस गेल निवृत्त होणार असल्याचे म्हटले आहे.

३९ वर्षांच्या ख्रिस गेलने आत्तापर्यंत २८४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ३७.१२ च्या अॅव्हरेजने त्याने ९ हजारांच्या वर धावा केल्या आहेत. २३ शतकं आणि ४९ अर्धशतकं गेलच्या नावावर जमा आहेत. २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरोधात ख्रिस गेलने २१५ धावा केल्या होत्या. विश्वचषकातली ही त्याची पहिली द्विशतकी खेळी होती. कसोटीत त्रिशतक, एकदिवसीय सामन्यात द्विशतक आणि आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात शतक झळकवाणारा ख्रिस गेल हा जागतिक क्रिकेटमधला एक उत्कृष्ट खेळाडू आहे. १०३ कसोटी सामने आणि ५६ टी २० सामनेही गेल खेळला आहे.