News Flash

घरच्या मैदानावर विंडीजची सरशी, दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडवर मात

10 वर्षांत विंडीजचा इंग्लंडविरुद्ध पहिला मालिकाविजय

कर्णधार जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विंडीजने घरच्या मैदानावर खेळताना ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. अँटीग्वा कसोटी सामन्यात इंग्लंडवर 10 गडी राखून मात करत विंडीजने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. विंडीजचा इंग्लंडविरुद्धचा गेल्या 10 वर्षातला हा पहिला कसोटी मालिकाविजय ठरला आहे. या मालिकेतला आणखी एक सामना होणं बाकी आहे.

नाणेफेक जिंकून सामन्यात प्रथम गोलंदाजी केलेल्या विंडीजने इंग्लंडला 187 धावांमध्ये रोखलं. केमार रोचचे 4 बळी आणि त्याला शेनॉन गॅब्रिअलने 3 बळी घेत दिलेली भक्कम साथ या जोरावर पहिल्या डावावर विंडीजने वर्चस्व गाजवलं. इंग्लंडकडून मधल्या फळीत जॉनी बेअरस्टो आणि मधल्या फळीतल्या मोईन अलीने अर्धशतकी खेळी केली. या दोघांना बेन फोक्सने चांगली साथ दिली, मात्र खेळपट्टीवर जास्तकाळ टिकून राहणं त्यांना जमलं नाही. इतर फलंदाजांकडून साथ न मिळाल्यामुळे इंग्लंड पहिल्या डावात 187 धावांपर्यंतच मजल मारु शकला.

प्रत्युत्तरादाखल विंडीजने इंग्लंडच्या गोलंदाजांचा पुरता समाचार घेतला. विंडीजच्या पहिल्या 4 क्रमांकाच्या फलंदाजांनी 40 च्या वर धावा काढून आपल्या संघाला भक्कम पायाभरणी करुन दिली. या जोरावर विंडीजने 306 धावा करत इंग्लंडवर 119 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडकडून पहिल्या डावात स्टुअर्ट ब्रॉड आणि मोईन अलीने प्रत्येकी 3-3 बळी घेतले. यानंतर दुसऱ्या डावातही इंग्लंडच्या संघाची पुरती दाणादाण उडाली. केमार रोच आणि कर्णधार जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 4-4 बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं.

दुसऱ्या डावात इंग्लंडचा एकही फलंदाज अर्धशतकी खेळी उभारु शकला नाही. यानंतर विजयासाठी आवश्यक असलेलं 14 धावांचं आव्हान विंडीजच्या सलामीवीरांनी पूर्ण करत आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 8:34 am

Web Title: windies humble england by 10 wickets and win test series
Next Stories
1 अखेरच्या सामन्यात भारताची बाजी, मालिकेवरही 4-1 ने कब्जा
2 भारताच्या फलंदाजीला धोनीचा दिलासा
3 दमलेल्या खेळाडूंची कहाणी!
Just Now!
X