अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

‘‘जोपर्यंत भारतामध्ये क्रिकेट जिवंत आहे, तोपर्यंत अजित वाडेकर यांना कुणीही विसरू शकत नाही. त्यांनी लिहिलेल्या सुवर्णाध्यायाशिवाय भारताचा क्रिकेट इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. अनेक मोठी माणसे घडवण्याचे मोठेपण त्यांच्यामध्ये आहे,’’ अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे ७५व्या वाढदिवशी अभीष्टचिंतन केले.

‘सुवर्णकाळाचे शिल्पकार’ ठरलेल्या वाडेकरांना अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या शिष्यांनी अनुभवाचा पुष्पगुच्छ सादर केला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी वाडेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि चांदीचा मुलामा असलेली बॅट देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाला माधव आपटे, सुनील गावस्कर, मिलिंद रेगे, मोहम्मद अझरुद्दीन, प्रवीण अमरे व विनोद कांबळी हे माजी क्रिकेटपटू उपस्थित होते.

‘‘अजूनही लोक मला ओळखतात, हे पाहून फार गहिवरून आले आहे. मी शाळेत क्रिकेट खेळलो नाही, पण रुईया महाविद्यालयातून क्रिकेटला सुरुवात केली. सुरुवातीला मी फक्त पाणी देण्याचे काम करायचो, त्यासाठी तीन रुपये मिळायचे. तुम्ही साऱ्यांनी माझ्यावर निर्लेप प्रेम केले त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो,’’ अशा शब्दांत वाडेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गावस्कर यांनी आपल्या गतआठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, ‘‘माझ्या पहिल्या रणजी सामन्यात वाडेकर यांनी ३२३ धावा केल्या, त्या वेळी ते जेव्हा पॅव्हेलियनमध्ये यायचे, तेव्हा मी त्यांचे पॅड काढायचो. ही चमचेगिरी नव्हती तर आदर होता. १९७१च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात भारताने पहिला परदेशातील विजय मिळवला. त्याची मुहूर्तमेढ वाडेकर यांनी वेस्ट इंडिजला फॉलोऑन देऊन केली.’’

वाडेकर यांच्या खेळाबद्दल गावस्कर म्हणाले की, ‘‘त्यांची फलंदाजी आमच्यासाठी शिक्षण होते. नशीबवान कर्णधार म्हणून ते झाकोळले गेले. खरे तर त्यांचे नेतृत्व कुशल होते. आता आपण महेंद्रसिंग धोनीला संयमी कर्णधार म्हणतो, पण वाडेकर हे पहिले शांत कर्णधार होते. वाडेकर ३६० अंशांमध्ये कुठेही फटकेबाजी करू शकत होते.’’

म्हैसूरचे त्रिशतक हेच डॉक्टरांचे शुल्क

१९६७ साली आमचे बाबा आजारी होते. त्या वेळी अजितने डॉक्टरांना त्यांचे शुल्क विचारले. तेव्हा म्हैसूरच्या सामन्यात शतक केलेस की माझे शुल्क मला मिळाले म्हणून समज, असे डॉक्टर म्हणाल्याचे अजितने सांगितले. त्या सामन्यात ३२३ धावा करत अजितने आपले शब्द पाळले, अशी आठवण त्यांचे बंधू अशोक यांनी सांगितली.

पोलादी मनगटाची फटकेबाजी

अजितची फलंदाजी ही लाजवाब होती. त्याच्या फटक्यांनी निखळ आनंद दिला. त्याच्या पोलादी मनगटातून बाहेर निघालेले फटके नरजेचे पारणे फेडायचे. १९७१ साली त्यांनी जो ऐतिहासिक विजय मिळवला ते कौतुकास्पद आहे. अजितचा त्यासाठी नेहमीच हेवा वाटतो, असे भारताचे माजी क्रिकेटपटू माधव आपटे यांनी सांगितले.

दादा फलंदाज आणि महान कर्णधार

वाडेकर हे दादा फलंदाज आणि महान कर्णधार होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन बरेच कर्णधार शिकले. परदेशातही भारतीय संघ जिंकू शकतो, हे वाडेकर यांनी सर्वप्रथम दाखवून दिले. त्यांची फलंदाजी न पाहणारे कमनशिबी आहेत, असे मुंबईचे माजी क्रिकेटपटू मिलिंद रेगे म्हणाले.

माणुसकी शिकलो

वाडेकर सरांकडून मी माणुसकी शिकलो. त्यांचा सल्ला व मार्गदर्शन नेहमीच मला उपयोगी पडले. त्यांनी खास आग्रहास्तव आम्हाला फलंदाजी करून दाखवली, त्या वेळी मी सारे काही विसरून गेलो होतो,  असे भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने सांगितले.

मोलाचे मार्गदर्शन

वाडेकर सरांमुळेच मला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात खेळू शकलो. दरबानसारख्या वेगवान खेळपट्टीवर खेळताना त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केले. त्या दौऱ्यात ते एकटे माझ्या पाठिशी होत़े, असे भारताचे माजी क्रिकेटपटू  प्रवीण अमरे यावेळी म्हणाले.

..तेव्हा त्यांनी आत्मविश्वास दिला!

मला फलंदाजी करायचा आत्मविश्वास वाडेकर सरांनी दिला. १९९६च्या विश्वचषकात जेव्हा मी रडत पॅव्हेलियनमध्ये गेलो तेव्हा त्यांनी मला पहिली मिठी मारली, अशा शब्दांत भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने आठवणी जाग्या केल्या.