आज ऑस्ट्रेलियाशी अंतिम लढत; शफाली-स्मृतीकडून चांगली सुरुवात अपेक्षित

भारताची महिलांच्या तिरंगी ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत बुधवारी यजमान ऑस्ट्रेलियाशी लढत होत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये फलंदाजांना लय सापडल्याने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारताचे जेतेपद पटकावण्याचे ध्येय आहे. हे जेतेपद पटकावत २१ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियातच होणाऱ्या महिलांच्या ट्वेन्टी-२० स्पर्धेसाठी सज्ज होण्याची भारताला संधी आहे.

भारताची या स्पर्धेत पहिल्या तीन लढतींमध्ये फलंदाजी अपयशी ठरली होती. मात्र नंतरच्या साखळी लढतीत भारताने फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचे १७४ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य दोन चेंडू राखून पार केले. शफाली वर्मा (२८ चेंडूंत ४९ धावा) आणि स्मृती मानधना (४८ चेंडूंत ५५ धावा) या सलामीवीरांनी त्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. पुन्हा एकदा या दोघींकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे. दोघीही त्यांच्या खेळीत चेंडू सीमापार करत झटपट धावा काढण्यात यशस्वी ठरत आहेत. मधल्या फळीत भारताच्या फलंदाजीची भिस्त जेमिमा रॉड्रिग्ज, कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यावर आहे.

या स्पर्धेत भारताची गोलंदाजी चांगली झाली आहे. दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड यांनी स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. राजेश्वरीने या स्पर्धेत सर्वाधिक बळी (चार सामन्यांत ८ बळी) घेतले आहेत. दीप्तीने चार सामन्यांत ५ बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाची फलंदाजीची फळीदेखील मजबूत आहे. बेथ मूनी, अ‍ॅश्लेघ गार्डनर, मेग लॅनिंग या फलंदाजांसह गोलंदाज एलिस पेरी यांनी मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. या स्थितीत लढत रंगतदार होण्याची अपेक्षा आहे.

नोबॉल तंत्रप्रणालीचा विश्वचषकात वापर – आयसीसी

महिलांच्या २१ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत गोलंदाजांच्या पायावर लक्ष ठेवणाऱ्या नोबॉल तंत्रप्रणालीचा प्रथमच वापर करण्याचे आयसीसीने ठरवले आहे. भारत आणि वेस्ट इंडिज येथे झालेल्या क्रिकेट मालिकांमध्ये गोलंदाजांच्या पायावर लक्ष ठेवणाऱ्या नोबॉल तंत्रप्रणालीचा यशस्वी पद्धतीने वापर झाला होता. ते हेरूनच आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. ‘‘तिसरे पंच प्रत्येक चेंडूच्या वेळेस गोलंदाजांच्या पायावर लक्ष ठेवतील. तसेच जर नोबॉल आढळला तर लगेचच तिसरे पंच हे मैदानातील पंचांना सूचना देतील. परिणामी मैदानातील पंचांना नोबॉल स्वत:हून घोषित न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अर्थातच अन्य प्रकारचे नोबॉल घोषित करण्याचा मैदानातील पंचांना अधिकार आहे,’’ असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.