२०१७ च्या महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिलांनी सुरुवातीच्या सामन्यात विजय मिळवत धडाक्यात सुरुवात केली आहे. भारतीय महिलांनी सिंगापूरचा १०-० असा धुव्वा उडवत, आपण या स्पर्धेत विजयाच्या उद्दीष्टाने उतरल्याचं दाखवून दिलं. नवनीत कौर ( ३ आणि ४१ वे मिनीट), राणी रामपाल (१५ व १८ वे मिनीट), नवजोत कौर (३० आणि ५० वे मिनीट) या खेळाडूंनी सामन्यात प्रत्येक २-२ गोल झळकावले. तर लारेमिसामी, दीप एक्का, गुरजीत कौर आणि सोनिका यांनी वाहत्या गंगेत हात धुवत सिंगापूरवर आपला दबाव कायम राखला.

सिंगापूरच्या पेनल्टी क्षेत्रात प्रवेश करत भारतीय महिलांनी सामन्यात आक्रमक सुरुवात केली. सुरुवातीच्या काही मिनीटांत भारतीय महिलांना पेनल्टी कॉर्नवर गोल करण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र सिंगापूरची गोलकिपर फेलिसा लीने उत्तम बचाव करत भारतीयांचा मनसुबा उधळून लावला. मात्र यानंतर नवनीत कौर आणि राणी रामपाल यांच्या गोलमुळे भारताने सामन्यात २-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात भारतीय महिलांनी आपला हाच धडाका कायम राखत मध्यांतरापर्यंत सामन्यात ६-० अशी आघाडी घेतली.

मध्यांतरानंतर दीप एक्काने २५ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नवर गोल झळकावला. यानंतर ड्रॅगफ्लिकर गुरजीत कौरनेही मिळालेल्या संधीचा फायदा घेत सामन्यात भारताचा सातवा गोल झळकावला. यानंतर भारतीय महिलांनी सिंगापूरच्या बचावफळीवर आपला दबाव कायम राखत आणखी २ गोल झळकावत भारताची आघाडी ९-० अशी वाढवली. अखेरच्या सत्रात भारताला मिळालेला पेनल्टी कॉर्नर सिंगापूरच्या गोलकिपरने पुन्हा अडवला, मात्र यातून निर्माण झालेल्या संधीतून नवजोत कौरने ५० व्या मिनीटाला गोल करत सामन्यात भारताचा १० वा गोल झळकावला. दुसऱ्या सामन्यात चीनने मलेशियाचा अटीतटीच्या सामन्यात ५-४ असा पराभव केला.