बुद्धिबळ आणि रशियाची मक्तेदारी हे समीकरण आता कालपरत्वे लोप होत चालले आहे. केवळ ताकदीची नव्हे तर बुद्धीची कसोटी ठरणाऱ्या खेळांमध्येही आम्ही वर्चस्व मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहोत, k02हेच दाखवून देत चीनच्या खेळाडूंनी बुद्धिबळातील रशियन देशांच्या साम्राज्याला शह देण्यास सुरुवात केली आहे. महिलांमध्ये त्यांच्या खेळाडूंनी विश्वविजेतेपदावर आपली मोहोर नोंदविली आहेच, परंतु आणखी तीनचार वर्षांमध्ये पुरुषांच्या गटातही त्यांचा खेळाडू विश्वविजेता झाल्यास नवल वाटणार नाही.
कनिष्ठ गटाची जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच पुण्यात आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील खुल्या गटात चीनच्या लु शांगलेई व वेई येई यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकून आपल्या भावी यशाची मुहूर्तमेढ नोंदविली आहे. मुलींमध्ये त्यांच्या झाई मो हिने पाचवे स्थान पटकावले. चीनच्या खेळाडूंबाबत असे दिसते की जेव्हा त्यांच्या एखाद्या खेळात किंवा मोठय़ा स्पर्धेत चांगल्या यशाची खात्री असते, तेव्हाच ते आपल्या खेळाडूंना उतरवितात. ऑलिम्पिक व आशियाई क्रीडा स्पर्धासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये त्यांना जेव्हा पदकांची लयलूट करण्याची खात्री निर्माण झाली, तेव्हाच त्यांनी आपल्या खेळाडूंना त्या स्पर्धामध्ये उतरविले. आपल्या खेळाडूंनी केवळ परदेशवारी करून मायदेशी परत यावे, या हेतूने त्यांनी कधीच आपल्या खेळाडूंना भाग घेऊ दिलेला नाही.
जागतिक कनिष्ठ स्पर्धेतील चीनचे खेळाडू आणि प्रशिक्षक लिऊ विलियांग यांच्यातील आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता.दररोज स्पर्धेतील फेरी संपल्यानंतर साधारणपणे एक तासाने पुढच्या फेरीची कार्यक्रमपत्रिका तयार होत असे. त्यांचे खेळाडू व प्रशिक्षक हेही कार्यक्रमपत्रिका पाहून लगेच आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूची सारी कुंडलीच लॅपटॉपद्वारे मांडून त्याबाबत चर्चा करीत असत. त्यामुळेच त्यांचे खेळाडू या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करू शकले.
बुद्धिबळात गेल्या सहा-सात वर्षांमध्ये चीनने खूप मोठी प्रगती केली आहे. २०२०मध्ये त्यांच्या खेळाडूने वरिष्ठांच्या खुल्या गटात विश्वविजेतेपदाला गवसणी घातली पाहिजे, हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत त्यांच्या संघटकांनी त्यादृष्टीने विविध योजना आखल्या आहेत. चीनमध्ये तीस लाख लोक बुद्धिबळ खेळतात. त्यापैकी तीन लाख लोक त्यांच्या राष्ट्रीय महासंघाशी संलग्न आहेत. जागतिक क्रमवारीत खुल्या गटात पहिल्या शंभर खेळाडूंमध्ये त्यांच्या पाच खेळाडूंचा समावेश आहे. त्यांच्या वीसहून अधिक खेळाडूंनी ग्रँडमास्टर किताब मिळविला आहे. झुई चेन, बुई झियांगझी, वाँग युई, नी हुआ, वाँग हाओ यांनी खुल्या गटात जागतिक स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. बुद्धिबळ ऑलिम्पिकमध्ये त्यांच्या खेळाडूंनी रौप्यपदकही मिळविले आहे.
महिलांमध्ये झेई जुआन हिने दोन वेळा विश्वविजेतेपद मिळविले आहे. झुई युहाना, होऊ यिफान यांनीही हा मान मिळविला आहे. त्यांच्या दहा खेळाडूंनी महिला ग्रँडमास्टर किताब मिळविला आहे. जागतिक क्रमवारीतील पहिल्या शंभर खेळाडूंमध्ये त्यांच्या बारा खेळाडूंनी स्थान मिळविले आहे. बुद्धिबळ ऑलिम्पिकमध्ये त्यांनी दोन वेळा अजिंक्यपद मिळविले आहे.
या खेळाची लोकप्रियता वाढावी यासाठी त्यांच्या संघटकांनी गॅरी कास्पारोव्ह, ज्युडिथ पोल्गर यांच्यासह अनेक श्रेष्ठ खेळाडूंना चीनमध्ये आमंत्रित करीत त्यांचे प्रदर्शनीय सामने आयोजित केले आहेत. एका वेळी अनेकांबरोबर डाव खेळल्यास त्यास अधिक लोकप्रियता व प्रसिद्धी मिळते हे पाहून त्यांनी अशा अनेक सामन्यांची मालिका आयोजित केल्या आहेत.
अनेक शहरांमध्ये प्रशिक्षण अकादमी स्थापन करून त्याद्वारे नैपुण्य शोध घेऊन त्यांचा विकास करण्यावर संघटना प्रयत्न करीत आहेत. शालेय अभ्यासक्रमातही त्यांनी बुद्धिबळाचा समावेश केला आहे. त्यामुळे शालेय स्तरावरच चांगले नैपुण्य मिळू लागले आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या शालेय विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेमध्येही खूप वाढ होऊ लागली आहे. आगामी तीन वर्षांमध्ये जगातील अनेक नामवंत ज्येष्ठ खेळाडूंना चीनमध्ये आमंत्रित करीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय संघांकरिता सराव शिबिरे आयोजित करण्याची योजना त्यांनी आखली आहे व लवकरच ती अमलात आणली जाईल.
क्रीडा क्षेत्रात चीनच्या खेळाडूंनी केलेल्या प्रगतीबाबत भारतीय खेळाडूंनी बारकाईने अभ्यास केला पाहिजे. केवळ शारीरिक नव्हे तर बौद्धिक कसोटी ठरणाऱ्या खेळांमध्येही चीनचे खेळाडू अग्रेसर होऊ लागले आहेत.
एकाग्रतेचा सराव, खेळावरील निष्ठा, स्पर्धात्मक आत्मविश्वास आदींबाबत चीनच्या खेळाडूंच्या शैलीचा भारतीय खेळाडूंनी अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आपले युवा खेळाडू बुद्धिबळात कमी नाही. मात्र विश्वनाथन आनंद याचा वारसा पुढे चालवण्यासाठी युवा खेळाडूंनी प्रयत्न करण्याची गरज आहे. जागतिक स्पर्धेत अध्र्या गुणानेही पदकाच्या संधीपासून वंचित व्हावे लागते. हा अर्धा गुण आपल्याला पुढच्या स्पर्धेत कसा मिळविता येईल याचा विचार आपल्या खेळाडूंनी केला पाहिजे. संघटनात्मक स्तरावर भारतीयांनी ही स्पर्धा अतिशय यशस्वी केली. त्यामध्ये पदक मिळाले असते तर त्याची गोडी अधिक चांगली झाली असती.