क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ३० मे पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत १६ जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. मात्र पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारताने पाकिस्तानशी सामना खेळू नये, असा सूर सर्वत्र उमटू लागला आहे. पण या मतप्रवाहाच्या विरोधात एक मत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी व्यक्त केले आहे.

शशी थरूर यांनी एक ट्विट करून आपली भावना व्यक्त केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना भारताने जरूर खेळावा असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ‘कारगील युद्ध होऊनही १९९९ च्या इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. आणि तो सामना भारताने जिद्दीने जिंकलाही होता. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत पाकिस्तानशी होणारा सामना रद्द करणे म्हणजे केवळ दोन गुण गमावणे इतकेच नाही, तर ही बाब म्हणजे शरणागती पत्करण्यापेक्षाही वाईट स्थिती ठरेल. कारण हे म्हणजे लढण्याआधीच हार पत्करण्यासारखे होईल’, असे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० हून अधिक जवान शहीद झाले. त्यानंतर भारतातील राज्य क्रिकेट संघटनांनी पाकिस्तानी क्रिकेटपटूचे फोटो आपल्या स्टेडियममधून आणि मुख्यालयात हटवले. तसेच त्यानंतर अनेक क्रिकेट जाणकारांनी आणि दिग्गज क्रिकेटपटूंनी हा सामना रद्द करण्याची मागणी केली होती.