विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना आज मंगळवारी मँचेस्टरमध्ये रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यात नाणेफीकाचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. यंदाच्या विश्वचषकाचे विश्लेषण केले असता नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने सामन्यात बाजी मारल्याचे चित्र समोर येते.

मंगळवारी होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामन्यातही नाणेफेक महत्वाची ठरणार आहे. धावांचा पाठलाग करण्यात भारतीय संघ इतर संघाच्या तुलनेत आघाडीवर आहे. पण या विश्वचषकात असे पहायला मिळालेय की धावांचा पाठलाग करताना प्रत्येक संघाला कसरत करावी लागली आहे. त्यामुळे कोणताही संघ दुसऱ्यांदा फलंदाजी करायची टाळत आहे.

आज नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने पडतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या विश्वचषकातील मागील २० सामन्यापैकी १६ वेळा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. फक्त चार वेळा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. यामध्ये एक सामना भारताचाही आहे. भारताने श्रीलंका संघाविरोधात धावांचा पाठलाग करत विजय संपादन केला.

आजच्या सामन्यात सर्वांचे लक्ष नाणेफेकीवर असणार आहे. मँचेस्टरमध्ये पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळेही नाणेफेकीचा कौल महत्वाचा मानला जातोय. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभा करण्याचा प्रयत्न करू शकते. भारतीय कर्णधार विराट कोहलीने सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत याची चिंता नसल्याचे म्हटले आहे.

उपांत्य सामन्यात प्रत्येक संघ पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी नाणेफेक जिंकणे महत्वाचे आहे. दबावाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाला लवकर बाद करण्याचा विचार प्रत्येक कर्णधाराचा असतो. लक्षाचा पाठलाग करताना पावासाने व्यत्यय आणल्यास डकवर्थ लुईस नियमांचे भानही ठेवावे लागणार आहे. धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने अनेक अशक्यप्राय विजय मिळवले आहेत.

आज मँचेस्टरमध्ये पावसाने हजेरी लावली आणि सामना रद्द झाल्यास राखीव दिवशी सामना खेळवला जाईल. दुसऱ्या दिवशीही पावसाने खोडा आणला आणि सामना होऊ शकला नाही. तर भारतीय संघाला अंतिम सामन्याचे तिकिट मिळणार आहे. हवामान विभागाने दोन दिवस मँचेस्टरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.