मनू, सौरभची रौप्यपदकावर मोहोर; अभिषेक, दिव्यांशला कांस्य

बलाढय़ प्रतिस्पध्र्यावर मात करत भारताची नेमबाज यशस्विनी सिंह देस्वाल हिने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी सुवर्णपदकाची कमाई केली. मनू भाकर, सौरभ चौधरी यांना रौप्य तर अभिषेक वर्मा आणि दिव्यांश सिंह पनवार यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.दिव्यांशने शनिवारी सकाळी पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात देशाला पहिले कांस्यपदक मिळवून दिल्यानंतर महिलांच्या याच प्रकारात अंजूम मुदगिल हिची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली.

भारतासाठी शनिवारचा दिवस संस्मरणीय ठरवला तो यशस्विनीने. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात यशस्विनीने अंतिम फेरीत २३८.८ गुणांची कमाई करत सुवर्णयश संपादन केले. मनू भाकर हिला २३६.७ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागलेसौरभ चौधरीने (२४३.२ गुण) अखेरच्या प्रयत्नांत घाई केल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. इराणच्या जावेद फोरौघी याने २४३.६ गुणांसह सुवर्णपदक जिंकले.जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या दिव्यांशने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. दिव्यांशने अंतिम फेरीत २२८.१ गुण पटकावले.

तीन नेमबाजांना करोना

आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सहभागी झालेल्या तीन नेमबाजांना करोनाची लागण झाली आहे. या नेमबाजांना हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या तिघांसोबत एकाच खोलीत राहणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या तिघांमध्ये भारताच्या दोन नेमबाजांचा समावेश असल्याचे समजते.