वर्ल्ड हॉकी लिग सेमीफायनल स्पर्धेत भारताने कॅनडावर ३-० अशी मात केली. समोर कॅनडाचा संघ असल्यामुळे या सामन्यात भारतासमोर फारसं काही आव्हान नव्हतं. भारतीय खेळाडूंनीही या संधीचा पुरेपूर फायदा उचलत या सामन्यात चांगला सराव करुन घेतला.

भारताकडून एस.व्ही.सुनीलने ५ व्या मिनीटाला गोल केला. यानंतर दडपणाखाली गेलेला कॅनडाचा संघ पुन्हा वर आलाच नाही. भारताच्या आघाडीच्या फळीतल्या खेळाडूंनी या सामन्यात चांगला ताळमेळ दाखवत काही मैदानी गोलही केले. १० व्या मिनीटाला आकाशदीप सिंहने केलेला गोल याचाच नमुना होता. यापाठोपाठ भारतीय संघातला सर्वात अनुभवी खेळाडू सरदार सिंहने १८ व्या मिनीटाला बॉल गोलपोस्टमध्ये ढकलून भारताची आघाडी ३-० अशी वाढवली.

पहिल्या सत्रानंतर मात्र कॅनडाच्या खेळात काहीशी सुधारणा दिसून आली. हाफ टाईमनंतर कॅनडाची बचावफळी अधिक सतर्कतेने खेळताना दिसत होती. हाफ टाईमनंतर भारतीय खेळाडूंना पेनल्टी कॉर्नरवर अनेक संधी मिळाल्या मात्र कॅनेडीयन गोलकिपर डेव्हिड कार्टरने भारताची सगळी आक्रमण परतावून लावली. तसेच शेवटची दोन सत्र कॅनडाच्या खेळाडूंनी भारताच्या खेळाडूंना जास्त आक्रमण करण्याची संधी दिली नाही. भारतीय खेळाडूंनी बेसलाईनवरुन अनेक चाली रचण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे प्रयत्न फसले. कॅनडाने आपल्या आधीच्या साखळी सामन्यातही चांगली कामगिरी केली होती. त्यांनी पाकिस्तानच्या संघाला ६-० अशी अनपेक्षितरित्या धूळ चारली होती.

दुखापतीमुळे भारताचा भरवशाचा गोलकिपर रुपिंदरपाल सिंह आजच्या सामन्यातही खेळू शकला नाही. ज्याचा फटका भारताला अखेरच्या सत्रात बसलेला पहायला मिळाला. रविवारी भारताचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. त्यावेळी रुपिंदरची अनुपस्थिती भारताला जाणवू शकतो. त्यामुळे उद्याच्या सामन्यात भारतीय खेळाडू पाकिस्तानला कसे सामोरे जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.