जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान असणारी ऑस्ट्रेलियन महिला टेनिसपटू अ‍ॅशले बार्टी हिने यंदाच्या अमेरिकन ओपन खुल्या टेनिस स्पर्धेतून (US Open) माघारी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. करोनाचा धोका लक्षात घेता तिने हा निर्णय घेतल्याचे वृत्त IANS ने दिले आहे. ३१ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या दरम्यान न्यूयॉर्कमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.

 

View this post on Instagram

 

Incredible

A post shared by Ash Barty (@ashbarty) on

“मी आणि माझ्या संघाने यंदाच्या Western and Southern Open आणि US Open या दोन्ही स्पर्धांसाठी अमेरिकेला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या दोनही स्पर्धा माझ्या हृदयाच्या अगदी जवळच्या आहेत. त्यामुळे मला हा निर्णय घेणे खूप कठीण गेलं. पण प्रवासादरम्यान अजूनही करोनाचा धोका असल्याची बाब लक्षात घेत मी हा निर्णय घेतला आहे. कारण माझ्या संघाला आणि मला कोणताही धोका पत्करायचा नाही. US टेनिस असोशिएशनला मी या स्पर्धेच्या आयोजनासाठी शुभेच्छा देते. पुढल्या वर्षी मी नक्की स्पर्धेत सहभागी होईन”, असे बार्टीने हेराल्ड सनशी बोलताना सांगितले.

बार्टीने एप्रिल २०१० मध्ये व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण केले. पण तिला पहिलं ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी ९ वर्षे वाट पाहावी लागली. २०१९ च्या फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद तिने मिळवले. २०१०पासून तिने ८ स्पर्धांची विजेतेपदे मिळवली आहेत पण त्यात एकाच ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा समावेश आहे.