विश्वनाथन आनंदची प्रांजळ प्रतिक्रिया

‘एकामागून एक स्पध्रेत अपयश येत होते. त्यात लंडन क्लासिक स्पध्रेतील अपयश हे जिव्हारी लागणारे होते. लंडन क्लासिकमध्ये अखेरच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे रियाधमध्ये दाखल होताना मन निराश होते. पण, जलद बुद्धिबळ स्पध्रेतील पहिल्या लढतीने सकारात्मकतेची ऊर्जा दिली. त्यात पीटर लेकोला पराभूत केल्यानंतर अचानक वातावरण बदलले. हे जेतेपद पटकावण्यापेक्षा चांगली कामगिरी करण्याचे ध्येय ठेवले होते. ती करण्यात यशस्वी झालोच आणि चौदा वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळही संपवला. हे जेतेपद मला अचंबित करणारे आहे,’ अशी प्रांजळ प्रतिक्रिया विश्वनाथन आंनदने दिली.

जागतिक जलद बुद्धिबळ स्पध्रेत २००३ सालानंतर जेतेपद पटकावण्यात आनंदला यश आले. भारताच्या ग्रँडमास्टर आनंदने गुरुवारी झालेल्या जेतेपदासाठीच्या टायब्रेकरमध्ये रशियाच्या व्लॅदिमिर फेडोसीव्हला २-० असे नमवले. मागील काही वर्षांच्या कामगिरीचा आलेख पाहता खुद्द आनंदसाठीही हे जेतेपद सुखद धक्का देणारे ठरले.

तो म्हणाला, ‘पहिल्या तीन फेरीत अनिर्णित निकाल लागल्याने माझी चिंता वाढवली. पदक शर्यतीतूनही आपण बाद होतो की काय, अशी भिती वाटू लागली.पण, या स्पध्रेत अनेक अनपेक्षित वळणं आली, परंतु टायब्रेकरच्या लढतीत माझे पारडे जड झाले. हे सर्व काही अनपेक्षितच होते. त्यामुळे जग्गजेतेपदाचा आनंद शब्दात सांगणेही मला कठीण आहे.’

या जेतेपदाबरोबर ४८ वर्षीय आनंदने टीकाकारांच्या तोंडाला टाळे लावले. आनंदने संपूर्ण स्पध्रेत अपराजित्व कायम राखत अव्वल साखळी स्तरावर अव्वल स्थान निश्चित केले.  ‘रियाधमध्ये पहिल्या दिवशीच चांगला खेळ झाल्याने आनंदित झालो होतो. त्याने मला प्रचंड आत्मविश्वास मिळाला.   मॅग्नस कार्लसनविरुद्धचा विजय हा स्पध्रेतील महत्त्वाचा क्षण ठरला,’ असे आनंद म्हणाला.

आनंदचे मनापासून अभिनंदन. तुला निवृत्तीबाबत विचारणाऱ्या प्रत्येकाला तू हे जेतेपद समर्पित करशील, अशी मी आशा बाळगतो.     – गॅरी कास्पारोव्ह, रशियाचे महान बुद्धिबळपटू

कठीण प्रसंगी जेतेपद पटकावून तू स्वत:ला पुन्हा सिद्ध केलेस. तुझा दृढ निश्चय आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेतील तुझ्या जेतेपदाचा तमाम भारतीयांना अभिमान वाटतो. तुझे अभिनंदन.   नरेंद्र मोदी, पंतप्रधान