क्रिकेट या खेळात रणनितीला खूप महत्त्व असते. प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अथवा गोलंदाजांवर वरचढ होण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरल्या जातात. अशीच काहीशी रणनिती न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूने वापरली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तयारी म्हणून न्यूझीलंडचा फलंदाज खेळपट्टीवर चक्क कचरा टाकून फलंदाजीचा सराव करत आहे.

१८ जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात भारतीय फिरकीपटूंना सामोरे जाण्यासाठी डेवॉन कॉनवे खेळपट्टीवर कचरा टाकून फलंदाजीचा सराव करत आहे, जेणेकरून चेंडू कशा पद्धतीने खेळावा हे कोडे उलगडू शकेल. या सामन्याबरोबर न्यूझीलंडला इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. पहिला सामना २ जूनला लंडन येथे तर दुसरा सामना १० जूनला खेळवण्यात येईल.

भारतीय फिरकीपटूंना खेळणे आव्हानात्मक – कॉनवे

२९वर्षीय डावखुरा फलंदाज कॉनवे या दौर्‍यावर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. ”खेळपट्टीवर कचरा पसरवून वेगात वळण घेणारा चेंडू चांगला खेळता येईल. विशेषत: साउथम्प्टनमध्ये जर पावलांच्या खुणांमुळे चेंडू फिरला तर अशा पद्धतीने खेळायचा सराव असेल. फिरकी गोलंदाजी खेळणे सोपे नाही. योजनेप्रमाणे तयारी केल्यास आपण सामन्यात चांगले प्रदर्शन करू शकता”, असे कॉनवेने सांगितले.

कॉनवेने न्यूझीलंडकडून आतापर्यंत ३ एकदिवसीय आणि १४ टी-२० सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात एक शतक आणि एका अर्धशतकासह २२५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर टी-२० मध्ये या फलंदाजाने १५१च्या स्ट्राइक रेटने ४७३ धावा केल्या आहेत. या प्रकारात त्याने ४ अर्धशतके ठोकली आहेत. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्याला २०२१-२२ या वर्षासाठीच्या २० खेळाडूंच्या केंद्रीय कराराच्या यादीमध्ये स्थान दिले आहे.