भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडला धूळ चारल्यानंतर भारतीय महिला संघाने दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या संघावर दणदणीत मात केली. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ७ गडी राखून विजय मिळवला. अनुभवी मिताली राजने अर्धशतकी खेळी करून विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ जेव्हा मैदानावर येऊ लागला. तेव्हा डाव सुरु होण्याआधीच भारताच्या खात्यात १० धावा जमा झाल्या होत्या.

पाकिस्तानच्या फलंदाज खेळपट्टीवर धाव घेत असताना २ वेळा धावण्यासाठी प्रतिबंधित असलेल्या क्षेत्रातून धावत होते. याबाबत पंचांनी त्यांना ताकीददेखील दिली. पण त्यानंतरदेखील दोन वेळा पाकिस्तानच्या फलंदाजांनी ती चूक केलीच. त्यामुळे पंचांनी दोन वेळा त्यांच्या ५ धावा वजा केले. त्यामुळे भारताच्या शून्य चेंडूंत १० धावा झाल्या.

या सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानच्या संघाने १३५ धावांचे आव्हान दिले होते. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत १३४ धावा तडकावल्या. त्यात पाकिस्तानकडून बिसमाह मारुफने ४९ चेंडूत ५३ तर निदा दरने ३५ चेंडूत तडाखेबाज ५२ धावांची खेळी केली.