खेळाडूंनी अ‍ॅथलेटिक्स महासंघाने तयार केलेल्या नियमावलींचे कठोर पालन करावे व पुढील वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या समलिंगी खेळाडूंच्या स्पर्धेत भाग घेऊ नये असे आवाहन रशियाची पोलव्हॉल्टपटू येलेना इसिनबायेव्हा हिने येथे केले. येलेना या ३१ वर्षीय खेळाडूने नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली.
इसिनबायेव्हा याबाबत म्हणाली की , पुढील वर्षी होणाऱ्या बहुलिंगी स्पर्धेत भाग घेण्याचे प्रत्येक खेळाडूला स्वातंत्र्य असले तरी खेळाडूंनी रशियन नियमावलींचा आदर केला पाहिजे. जर अशा स्पर्धामध्ये भाग घेताना कायद्याचे उल्लंघन झाले तर त्या खेळाडूवर मोठी दंडात्मक कारवाई केली जाते तसेच त्या खेळाडूला पंधरा दिवस तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागते.  ती पुढे म्हणाली की, परंपरेला छेद देणारे कोणतेही कृत्य खेळाडूंनी करू नये. असे कृत्य झाल्यास आपल्या लोकांचा व देशाचा अपमान होईल. जे कोणी ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेते त्याने कायद्याचा आदर करीत खेळाची प्रतिष्ठा राखली पाहिजे असेही येलेना म्हणाली.