मुकुंद धस

तमिळनाडूमधील कोईमतूर येथे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या ३६व्या युवा (१६ वर्षांखालील) राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत भाग घेणाऱ्या महाराष्ट्राच्या संघांकडून गतवर्षीप्रमाणे पदकविजेती कामगिरी अपेक्षित आहे. त्याचबरोबर वरिष्ठ पातळीतील आपले स्थान कायम ठेवण्याची माफक अपेक्षा त्यांच्याकडून बाळगली जात आहे.

महाराष्ट्रच्या मुलींना गटात कर्नाटक आणि यजमान तमिळनाडूचे आव्हान पेलावे लागणार असून मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशविरुद्ध त्यांना विजयाची अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही. गटात दोन विजय नोंदवल्यास महाराष्ट्राच्या मुलींचा थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश होणार आहे. मुलांना मात्र गटातच बलाढय़ पंजाब, हरयाणा, तमिळनाडू, छत्तीसगड संघांशी झुंजावे लागणार असून वरिष्ठ विभागातील आपले स्थान कायम ठेवण्यासाठी त्यांना किमान एका विजयाची आवश्यकता आहे. गतवर्षी उदयपूर येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांना रौप्य तर मुलींना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

मुलींच्या विभागात गतविजेत्या पंजाब, यजमान तमिळनाडू आणि केरळ यांच्यात विजेतेपदासाठी चुरस अपेक्षित असून तुलनेत मुलांच्या विभागात तुल्यबळ राजस्थान, पंजाब, तमिळनाडू, केरळ, हरियाणा यांना समान संधी आहे. आठवडाभर रंगणाऱ्या या स्पर्धेत मुलांमध्ये २५ तर मुलींमध्ये २४ संघांची विभागणी त्यांच्या गतवर्षीच्या कामगिरीनुसार दोन विभागांत करण्यात आली आहे. वरिष्ठ विभागाचे सामने लाकडी पृष्ठभाग असलेल्या दोन बंदिस्त स्टेडियममध्ये तर कनिष्ठ विभागाचे सामने परिसरातील दोन सिमेंटच्या मैदानावर होणार आहेत.