देशातील दोन अव्वल टेनिसपटूंमध्ये रंगलेल्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या मुकाबल्यात युकी भांब्रीने सोमदेव देववर्मनवर विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत १७४व्या स्थानी असलेल्या युकीने एक तास आणि ४१ मिनिटांच्या लढतीत स्पर्धेतील अव्वल मानांकित सोमदेव देववर्मनचे आव्हान ६-२, ६-४ असे संपुष्टात आणले.
पहिल्या सेटमध्ये सातव्या मानांकित युकीने ब्रेकपॉइंट्सचा सामना केला नाही आणि त्याने सहजतेने पहिला सेटजिंकला. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंना सव्‍‌र्हिसवर नियंत्रण ठेवता आले नाही. मात्र सोमदेवच्या तुलनेत युकीने अचूक सव्‍‌र्हिसवर भर देत दुसऱ्या सेटसह सामन्यावर कब्जा केला.
अंतिम लढतीत त्याचा मुकाबला रशियाच्या बिगरमानांकित अलेक्झांडर क्रुडय़ावत्सेवशी होणार आहे. अलेक्झांडरने द्वितीय मानांकित इव्हजेनी डॉनस्कॉयचा ७-६ (४), ६-३ असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान पटकावले. चॅलेंजर दर्जाच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची युकीची ही तिसरी वेळ आहे. ऑस्ट्रेलियातील त्राराल्गॉन स्पर्धेत त्याने जेतेपद पटकावले होते तर काओसियुंग (तैवान) येथे झालेल्या स्पर्धेत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
 दुहेरी प्रकारात युकीने न्यूझीलंडच्या मायकेल व्हीनसच्या साथीने खेळताना रुबेन गोन्झालेस आणि अर्टेम सितक जोडीवर ६-२, ६-१ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. द्वितीय मानांकित भारताचा एन. श्रीराम बालाजी आणि न्यूझीलंडच्या ब्लाझ रोलाने ति चेन आणि मारेक सेमजानवा ६-३, ७-६(५) असे नमवत अंतिम फेरीत स्थान पटकावले.