भारताच्या युकी भांब्रीने लेक्सिंग्टन एटीपी चॅलेंजर स्पर्धेत विजयी सलामी दिली. युकीने क्रोएशियाच्या मॅटजिआ इकोटिकवर ७-५, ६-१ असा विजय मिळवला. रामकुमार रामनाथनला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडच्या ब्रायडन क्लेइनने रामकुमारला ६-३, ६-३ असे नमवले. एकेरी प्रकारात याआधी साकेत मायनेनी पराभूत झाला होता. यामुळे एकेरी प्रकारात युकी स्पर्धेतील भारताचा एकमेव प्रतिनिधी आहे. दरम्यान दुहेरी प्रकारात साकेत मायनेनी आणि रामकुमार रामनाथन यांनी आपापल्या साथीदारांसह खेळताना उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. साकेतने बल्गेरियाच्या दिमितर कुतोव्हस्कीसह खेळताना ऑस्ट्रेलियाच्या अलेक्स बोल्ट आणि अँड्रय़ू व्हिथिंटन जोडीवर ७-५, ५-७, १०-७ असा विजय मिळवला. रामकुमारने जॉन मिलमनच्या साथीने खेळताना अमेरिकेच्या सॅम बार्नेट आणि जेस विटेन जोडीचा ६-०, ६-० असा धुव्वा उडवला.