ऑस्ट्रेलियन खुली  टेनिस स्पर्धा

भारताचे आव्हान राखताना युकी भांब्रीने कॅनडाच्या पीटर पोलनस्कीवर मात करीत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील मुख्य फेरीत स्थान मिळवले. मात्र सहकारी रामकुमार रामनाथनला मुख्य फेरी गाठण्याचे स्वप्न साकार करता आले नाही.

सातत्यपूर्ण कामगिरीचा प्रत्यय घडवीत भांब्रीने १-६, ६-३, ६-३ असा विजय मिळवला. २५ वर्षीय खेळाडू भांब्रीची आता सायप्रसच्या माकरेस बघदातीस या बलाढय़ खेळाडूशी गाठ पडणार आहे. बघदातीसने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत २००६ मध्ये उपविजेतेपद मिळवले होते. रामकुमारला कॅनडाच्या व्हॅसेक पोस्पीसिलकडून ४-६, ६-४, ४-६ असा संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभव स्वीकारावा लागला. ग्रँड स्लॅमच्या पात्रता फेरीतील शेवटच्या फेरीत मिळवलेले स्थान हीच त्याच्यासाठी सर्वोत्तम कामगिरी ठरली.

भांब्रीने २००९ मध्ये येथे कनिष्ठ गटात विजेतेपद मिळवले होते. वरिष्ठ गटाच्या मुख्य फेरीत स्थान मिळविण्याची ही त्याची तिसरी वेळ आहे. यापूर्वी २०१५ मध्ये त्याला पहिल्या फेरीत अँडी मरेने हरवले होते. २०१६ मध्येही त्याला पहिल्या फेरीत टॉमस बर्डीचविरुद्ध हार मानावी लागली होती.

भांब्री म्हणाला, ‘‘येथील मैदान, हवामान आदी गोष्टी मला खूपच अनुकूल असल्यामुळे तिसऱ्यांदा मुख्य फेरी गाठली आहे. यापूर्वी येथे मला दोन वेळा मुख्य फेरीत अव्वल दर्जाच्या खेळाडूंबरोबर लढत द्यावी लागली होती. यंदा एक-दोन फेऱ्याजिंकू शकेन अशी आशा आहे.’’