बडोद्याची ३२२ धावांपर्यंत मजल; महाराष्ट्राच्या सत्यजितची प्रभावी गोलंदाजी

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा

बडोदा : आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव गाठीशी असणाऱ्या युसूफ पठाणने सोमवारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राविरुद्धच्या ‘अ’ गटातील लढतीत दमदार खेळी साकारली. मात्र त्याला शतकाने अवघ्या एका धावेने हुलकावणी दिली. अखेरच्या सत्रात डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्चावने सुरेख गोलंदाजी केल्यामुळे पहिल्या दिवसअखेर बडोद्याने नऊ फलंदाजांच्या मोबदल्यात ३२२ धावांपर्यंत मजल मारली.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या महाराष्ट्राला पहिल्याच षटकात यश मिळाले. अनुपम संकलेचाने बडोद्याचा कर्णधार केदार देवधरला शून्यावरच यष्टिचीत केले. त्यानंतर विष्णू सोळंकी व आदित्य वाघमोडे यांनी अनुक्रमे ३० व ३६ धावा करत संघाचा डाव सावरला. मात्र सत्यजितने तीन षटकांच्या अंतरात या दोघांना बाद केले. बडोद्याची ४ बाद ७० धावा अशी अवस्था असताना स्वप्निल सिंग व युसूफ यांची जोडी जमली.

दोघांनी पाचव्या गडय़ासाठी १६० धावांची भागीदारी रचून संघाला सावरले. १३ चौकार व एका षटकारासह स्वप्निल ७९ धावांवर राहुल त्रिपाठीचा शिकार ठरला. मात्र युसूफने एक बाजू लावून धरत संघाला तीनशे धावांचा पल्ला गाठून दिला. ९५ चेंडूंत १४ चौकार व दोन षटकारांसह युसूफ ९९ धावांवर चिराग खुराणाच्या गोलंदाजीवर बाद झाला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा लुकमन मेरीवाला व बाबशही पठाण दोघेही प्रत्येकी १४ धावांवर खेळत होते.

संक्षिप्त धावफलक

बडोदा (पहिला डाव) : ८३ षटकांत ९ बाद ३२२ (युसूफ पठाण ९९, स्वप्निल सिंग ७९; सत्यजित बच्चाव ४/८१).