मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने भारतासाठी तब्बल २४ वर्षे क्रिकेट खेळलं. त्याच्या समृद्ध कारकिर्दीच्या बळावर भारताने अनेक सामने आणि मालिका जिंकल्या. सचिनची तुलना सध्याच्या क्रिकेटमधील विराट कोहली, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ यांच्याशी केली जाते. पण नुकत्याच एका मुलाखतीत बॉलिवू़डचा प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य याने त्याची तुलना युसूफ पठाणशी केली. क्रिकेटमध्ये युसूफ पठाणकडे सचिनपेक्षाही मोठी हिरो म्हणून नावलौकिक मिळवण्याची संधी असल्याचे वक्तव्य त्याने स्पोर्ट्सकीडाशी बोलताना केले.

“टी२० क्रिकेटने खेळाडूंचे वैयक्तिक स्तरावरील महत्त्व कमी केले. टी२० क्रिकेट हे अतिशय चंचल आहे. या क्रिकेटमध्ये युसूफ पठाण हा सचिनपेक्षाही बडा खेळाडू म्हणून नावारूपास येऊ शकतो. जेव्हा आम्ही तरूण होतो, तेव्हा क्रिकेट आणि खेळाडूला खूप महत्त्व होतं. आम्ही रेडिओवर क्रिकेटचे समालोचन ऐकत बसायचो आणि मैदानावर काय घडत असेल याची कल्पना करायचो. पण टी२० क्रिकेटमुळे ती मजा निघून गेली”, असे तो म्हणाला.

“पूर्वी खेळाडू फलंदाजी करताना हेल्मेट्स वापरत नव्हते. अँडी रॉबर्ट्स, लिली, थॉम्पसन हे गोलंदाज भेदक मारा करायचे. आणि दुसऱ्या बाजूला सुनील गावसकरसारखा खेळाडू हेल्मेट न घालता चेंडू खेळायचा. तेव्हापासूनच तसे फलंदाज हिरो वाटायचे. त्याशिवाय एकनाथ सोलकरहेदेखील हिरो होते. हेल्मेट न घालता ते शॉर्ट लेगला फिल्डिंग करायचे आणि झकास कामगिरी करायचे. हल्लीचे खेळाडू हे पूर्णपणे सुरक्षा कवच घालून खेळतात. त्यामुळे त्यांना अपेक्षित आदर आणि सन्मान मिळत नाही”, असे तो म्हणाला.