भारतीय संघाचा षटकार किंग युवराज सिंगला त्याला माजी सलामीवीर सहकारी वीरेंद्र सेहवागने वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. युवराजची सर कोणालाही येणार नाही, असे सांगत युवराजचा संघर्ष हा प्रेरणादायी असल्याचे सेहवागने म्हटले आहे. ए टू झेड अद्याक्षरे लिहित एका अनोख्या अंदाजात सेहवागने ट्विटरवरुन युवीला संदेश लिहिला. या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत असून, अनेक क्रिकेट चाहते युवराजला शुभेच्छा देत आहेत. कॅन्सरच्या संघर्षातून उभे राहून त्याने क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करुन सर्वांनाच थक्क केले. त्यामुळेच त्याचा क्रिकेटमधील प्रवास हा प्रेरणादायी ठरतो.

गेल्या अनेक महिन्यांपासून युवराज सिंग भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. नोव्हेंबरच्या अखेरीस यो-यो टेस्टमध्ये पात्रता सिद्ध करत युवीने पुनरागमनाचे संकेत दिले. हे संकेत खरे व्हावेत, अशीच त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. चाहते त्याच्या पुनरागमनासाठी उत्सुक असल्याचे ट्विटरवर उमटलेल्या प्रतिक्रियातून दिसून येते. युवराज सिंगने दुबळ्या केनियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर ३० जून २०१७ मध्ये तो भारतीय संघाकडून वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचा सामना खेळला. संघात आपले स्थान पक्के करुन आगामी विश्वचषक स्पर्धेत मैदानात उतरण्यास तो उत्सुक आहे.

युवराजने टी-२० विश्वचषकात स्टूअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर ६ चेंडूत ६ षटकार खेचून क्रिकेटच्या मैदानात एक इतिहास रचला होता. २००२ मध्ये नेटवेस्ट मालिकेतील इंग्लंडविरुद्धची त्याची खेळी अविस्मरणीय अशीच होती. टी-२० सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकवण्याचा पराक्रम त्याच्याच नावे आहे. २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील डर्बनच्या मैदानात युवीने अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील न्यूझीलंडच्या मुन्रोचा १४ चेंडूत अर्धशतकाचा विक्रम त्याने मोडीत काढला होता.